जालना – येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या जिल्ह्यातील बारा संवेदनशील केन्द्रांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवण्यात येणार आहे. दहावीच्या चार तर बारावीच्या आठ परीक्षा केंद्रांचा यामध्ये समावेश असेल. विशेष म्हणजे यावर्षी दहावीच्या तुलनेत बारावीच्या परीक्षार्थ्यांची संख्या ४ हजार ७०५ एवढी अधिक आहे. परीक्षा केन्द्रांचे चित्रिकरणही करण्यात येणार असून सीसीटीवी कॅमेर्याची नजर असणार आहे.
दोन्ही परीक्षांत काॅपीमुक्त अभियान राबविण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित दक्षता समितीची बैठक पार पडली. सर्व परीक्षा केन्द्रांवर दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा समावेश असणारे बैठे पथक नियुक्त करण्यात येणार असून सहा भरारी पथके कॉपीमुक्त अभियानावर लक्ष ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आहे.
संवेदनशील केन्द्रांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये कॉपीमुक्त अभियानासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दहा परीक्षा केन्द्रांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. परीक्षा केन्द्रांच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात येणार असून तपासणी केल्यानंतरच परीक्षार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. शिक्षण आणि पोलीस विभागाचे जिल्हयातील संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
दरम्यान, जालना जिल्ह्यात परीक्षांची तयारी सुरू असून, पोलीस विभागाकडूनही बंदोबस्त, केंद्रांच्या परिघात पथके तैनात करणे, महसूल, शिक्षण विभागाच्या पथकांमध्ये अधिकारी, कर्मचारी सहभागासाठी पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे.

