‘देगलूर’मध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदान

निवडणुकीदरम्यान काँग्रेस आघाडी आणि भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी येऊ न गेले. वेगवेगळ्या समाजांच्या मतदानासाठी दोन्ही पक्षांनी जोर लावत प्रयत्न केले.

नांदेड : काँग्रेस आघाडीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शनिवारी ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने दिवंगत आमदारांचे पुत्र जितेश यांना उमेदवारी दिली, तर भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना पक्षात घेत उमेदवारी दिली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी व जनता दलाच्या उमेदवारांसह १२ जण या निवडणुकीत उतरले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी येत्या मंगळवारी होईल.

निवडणुकीदरम्यान काँग्रेस आघाडी आणि भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी येऊ न गेले. वेगवेगळ्या समाजांच्या मतदानासाठी दोन्ही पक्षांनी जोर लावत प्रयत्न केले. ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी पहिल्या टप्प्यात भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसप्रवेश केल्यामुळे भाजपकडून खासदार प्रताप पाटील चिखलीकर व अन्य पदाधिकाऱ्यांना प्रचारयंत्रणा राबवावी लागली. काँग्रेस आघाडीच्या प्रचाराची धुरा अशोक चव्हाण यांनी सांभाळली. ते तब्बल दोन आठवडे येथे तळ ठोकून होते.

भाजपचे उमेदवार सुभाष साबणे आणि काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी खतगाव येथे, तर माजी आमदार गंगाधर पटने, गंगाराम ठक्करवाड, माजी जि. प. अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांनी आपापल्या गावी मतदान केले.

मतदानकाळात स्थानिक तसेच बाहेरील पोलीस तुकड्यांचा चोख बंदोबस्त होता. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार मतदानकाळात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसभर ही प्रक्रिया सुरळीत चालली. भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी साबणे विजयी होतील, असा दावा सायंकाळी मतदानानंतर केला, तर काँग्रेस पक्षातर्फे आ. अमरनाथ राजूरकर यांनीही विजयाचा प्रतिदावा केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: More than 70 per cent turnout in deglaur akp

ताज्या बातम्या