पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यात पुरामुळे ५०० कोटींपेक्षा अधिकचे आर्थिक नुकसान झाले आहे. या भागातील ४० गावांचा आपण प्रत्यक्ष दौरा केला असून पुरात सर्वस्व गमावून बसलेल्या प्रत्येक कुटुंबाला केंद्र सरकारनेही आजवर दिली नाही, अशी सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. दरम्यान, हा पूर मध्यप्रदेश सरकारच्या चुकीमुळेच आला असा ठाम दावा त्यांनी केला.

नियोजन भवनात पत्रकारांशी बोलतांना वडेट्टीवार यांनी कोविड प्रमाणेच पूर्व विदर्भात पूरपरिस्थिती अतिशय भयावह असल्याचे सांगितले. भंडारा या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून त्या पाठोपाठ, चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली येथे मोठी हानी झाली आहे. १९९४ नंतर प्रथमच अशा प्रकारचा पूर या भागातील लोकांनी बघितला. आपण स्वत: चार जिल्ह्यातील ४० गावांना भेटी देवून लोकांचे दु:ख व समस्या जाणून घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, त्या सर्वाना सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासनही देण्यात आले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

मध्य प्रदेश सरकारने केवळ ८५ मि.मी. पाऊस पडणार अशी माहिती राज्य सरकारला दिली होती. प्रत्यक्षात ४१५ मि.मी.पाऊस झाला. ज्यांचे घर पूर्णत: पडली त्यांना घर बांधकामासाठी तर ज्यांचे घरांचे अंशता नुकसान झाले त्यांना दुरूस्तीसाठी केंद्र सरकारने आजवर दिली नाही ती सर्व प्रकारची मदत दिली जाणार आहे. तात्पूरती मदत १६ कोटी ४८ लाख जाहीर केली आहे. लवकरच आणखी मदत जाहीर करणार आहे.अन्न,धान्यापासून रॉकेल, कपडे देखील पुरविण्यात येणार आहे. आपण स्वत: ब्लँकेट व इतर खाद्य साहित्याचे वाटप सुरू केले आहे. शेतकऱ्यांना २० हजार ४०० रूपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत दिली जाणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

चंद्रपूरमध्ये लवकरच जनता कर्फ्यू –
करोना संक्रमण बघता चंद्रपूर शहरात लवकरच जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासाठी अधिकृत परवानगी दिली असल्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली. तसेच १०० खाटांचे आधुनिक करोना हॉस्पीटल, ९०० खाटांच्या हॉस्पीटलची तयारी केली आहे. ८० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे असेही त्यांनी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेवून जनता कर्फ्यू कोणत्या दिवसापासून लावायचा हे ठरविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.
दरम्यान, वडेट्टीवारांनी घोषित केलेल्या टाळेबंदीला कॉग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, कॉग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी स्थानिक व्यापारी व उद्योजकांना सोबत घेत विरोध केला होता. आता जनता कर्फ्यूला देखील विरोध करतात काय?याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. मात्र. चंद्रपूर शहर तथा जिल्हावासियांना टाळेबंदी हवी आहे, बहुतांश व्यक्ती टाळेबंदीच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर व्यक्त होत आहे.