लाल दिव्याची गाडी, मागे-पुढे पोलिसांची रेलचेल आणि दिमतीला वर्ग एकचे अधिकारी, असा नवाबी थाट सध्या निवडणूक निरीक्षक उपभोगत आहेत. सकाळी सहा वाजता लाल दिव्याची गाडी घेऊन निरीक्षकांचा ताफा शहराजवळील हातलादेवी परिसरात दररोज ‘मॉर्निंग वॉक’साठी धावताना दिसतो. निवडणुकीच्या नावाखाली सकाळपासून रात्री झोपेपर्यंत निवडणूक निरीक्षकांची मर्जी सांभाळण्यात भल्या भल्या अधिकाऱ्यांचा वेळ जात आहे.
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी व सामान्यांना निर्धोक वातावरणात मतदान करता यावे, या साठी दिल्लीतून देशातील प्रत्येक मतदारसंघात दोन निवडणूक निरीक्षक पाठविले आहेत. सामान्यत जनतेच्या समस्या व निवडणुकीविषयी तक्रारी जाणून घेण्यासाठी त्यांना स्थानिक पातळीवर काही सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक पुस्तिकेत म्हटले आहे. मात्र, या पुस्तिकेचा आधार घेत निवडणुकीच्या पशातून निरीक्षकांची चंगळ सुरू आहे. लोकांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना स्थानिक सीमकार्ड उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्या दिमतीला असलेल्या ‘लायझिनग ऑफिसर’ने चक्क मोबाईल, तेही महागडे खरेदी करून दिले आहेत. ते देखील केंद्राच्या तिजोरीतील पशातून!
जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्रापकी १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र गारपिटीने उद्ध्वस्त झाले. अशा काळात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवडणूक निरीक्षकांचा लायझिनग ऑफिसर म्हणून नेमले आहे. भल्या पहाटे निरीक्षकांना सुप्रभात केल्यानंतर लाल दिव्याच्या गाडीसह पोलिसांच्या फौजफाटय़ासह लायझिनग ऑफिसरचाही दररोज मॉìनग वॉक सुरू आहे. विशेष म्हणजे गाडीचा लाल दिवा न झाकता सर्वासमक्ष दररोज ही कसरत सुरू आहे.