सोलापूर : मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या मुद्दय़ावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी ४ मेपर्यंत मुदत दिल्यानंतर भोंगा वाजविणाऱ्या मशिदींसमोर दुप्पट आवाजाने भोंग्यावर हनुमान चालिसा पाठ वाजविण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापुरात बहुतांशी मशिदींवरील भोंगे न वाजविता अजान दिली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. एखादा अपवाद वगळता सर्वत्र शांतता होती.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रमजान ईदनंतर कोणत्याही मशिदींवरील भोंगे हटविले न गेल्यास संबंधित मशिदीसमोर दुप्पट आवाजात भोंगे वाजवून हनुमान चालिसा पाठ आणि महाआरती म्हणण्याचा इशारावजा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारीही रस्त्यावर गस्त घालत संवेदनशील भागावर नजर ठेवून होते. दरम्यान, बहुतांशी मशिदींमध्येही भोंग्याचा वापर न करता अजान दिली जात होती. पहाटे, दुपारी आणि सायंकाळी मशिदींवरील भोंगे वाजले नाहीत. त्यासाठी मशिदींचे विश्वस्त आणि मुतवल्लींसह पेशइमाम मंडळींनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे पोलीस खात्यावरील संभाव्य ताण कमी झाल्याचे दिसून आले. अक्कलकोट, माढा, करमाळा, बार्शी आदी विविध तालुक्यांमध्येही मशिदींमधील भोंग्यांचा वापर करणे बंद केल्याने सर्वत्र शांतता दिसून आली. या भागातही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने देखील अधिकृत परवाना असल्याशिवाय कोणत्याही प्रार्थनास्थळावर भोंगा वाजविता येणार नाही, असे दंडक घातले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. असा भोंग्याचा बेकायदेशीर वापर केल्याचे दिसून आल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
मशिदीसमोरील मंदिरात महाआरती
सोलापूर : सोलापुरात मनसैनिकांनी एका मशिदीलगत मारुती आणि गणपती मंदिरासमोर हनुमान चालिसा आणि महाआरतीसाठी भोंगे लावले असता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून बेकायदेशीरपणे लावलेले भोंगे व इतर साहित्य जप्त केले. मनसेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायदेशीर नोटिसही बजावण्यात आल्या. शहरातील दत्त चौक-हाजीमाई चौक ते माणिक चौकादरम्यान रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या कुरेशी मशिदीसमोरच सोन्या मारुती मंडळाने उभारलेले मारुती आणि गणपती मंदिर आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक मिहद्रकर हे सोन्या मारुती मंडळाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांच्याच नेतृत्वाखाली मनसैनिकांनी हनुमान चालिसा आणि महाआरती दुप्पट आवाजात वाजविण्यासाठी भोंगे लावले होते. त्यासाठी ५० कार्यकर्ते एकत्र आले असता पोलीसही तेथे पोहोचले. बेकायदेशीरपणे भोंगे वाजविता येणार नाही, असे बजावत पोलिसांनी भोंगे व इतर साहित्य जप्त केले. या वेळी मनसैनिकांची पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर भोंग्यांशिवाय मनसैनिकांनी महाआरती म्हटली. ‘जय श्रीराम’च्या घोषणाही दिल्या. मनसे सोलापूर लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख, अमर कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत महाआरती झाली.