scorecardresearch

आईकडूनच गर्भवती मुलीच्या हत्येची सुपारी

मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी विरूर पोलिसांनी समाज माध्यम, प्रत्येक पोलीस ठाण्यात मृत महिलेचे छायाचित्र पाठवले होते.

(संग्रहीत छायाचित्र)

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील कविठपेठ या गावात एका विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. चार महिन्याच्या गर्भवती मुलीच्या हत्येसाठी आईनेच सुपारी दिली होती. सैदा बदावत असे मृत महिलेचे नाव आहे. सैदाची आई लचमी बदावत, सिन्नू व शारदा या तिघांना विरूर पोलिसांनी अटक केली आहे. मृत आणि तिन्ही आरोपी तेलंगणातील आहेत. महाराष्ट्र- तेलंगणा राज्याचा सीमावर्तीत भागात असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कविठपेठ येथील शेतातील विहिरीत १८ फेब्रुवारीला महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी विरूर पोलिसांनी समाज माध्यम, प्रत्येक पोलीस ठाण्यात मृत महिलेचे छायाचित्र पाठवले होते. अशातच तेलंगणातील कोंडापेल्ली विजयवाडा येथून पोलिसांना भ्रमणध्वनी आला अन् तपासाला गती मिळाली. मृत महिलेचे नाव सैदा बदावत असून ती कोंडापेल्ली विजवाडा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. मृत सैदा हिचा दहा व्र्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला नऊ वर्षांची मुलगी आहे. ती पतीला सोडून आई- वडिलांकडे राहत होती. आपली मुलगी चुकीचे काम करतयं हे कळल्यावर वडील आणि मुलीत भांडणे व्हायची. त्यात आपल्या मुलीने झोपेच्या गोळय़ा देऊन आपल्या नवऱ्याला ठार मारले, अशी शंका आई लचमीला होती. अशात सैदा चार महिनांची गर्भवती असल्याची माहिती कळताच आईचा पारा भडकला. या प्रकाराने आपली बदनामी होईल, असे तिला वाटले. खमंग येथील लग्न सोहळय़ात सिन्नू, शारदा या पती- पत्नीची ओळख लचमीला झाली. जे काही घडलं ते लचमीने सिन्नू आणि शारदाला सांगितले. मुलगी सैदाला मारून टाका, त्यासाठी ३० हजार रुपये देण्याची कबुली लचमीने केली. ठरल्यानुसार गर्भपात करण्याचा बहाण्याने सिन्नू आणि शारदा या दोघांनी सैदा हिला चंद्रपूर जिल्ह्यातील कविठपेठ येथे आणले. आत्राम नामक शेतकऱ्याचा शेतातील विहिरीत सैदाला धक्का दिला. यात सैदाचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mother gives supari to kill her pregnant daughter zws