सोलापूर : पोटच्या अवघ्या सहा वर्षांच्या निष्पाप मुलाला निष्ठूर आईने कु-हाडीने छाटून दोन तुकडे करून त्याचा निर्घृणपणे खून केला आणि नंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माढा तालुक्यातील कव्हे गावात घडली. या घटनेने संपूर्ण माढा व कुर्डूवाडीचा परिसर हादरला आहे.

प्रणव गणेश चोपडे असे जन्मदात्रीच्या हातून खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. हे भयानक कृत्य करून तणनाशक प्राशन केलेली त्याची आई कौशल्या ऊर्फ कोमल हिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे सासरे नारायण जगन्नाथ चोपडे (वय ५७) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची सून कौशल्या हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे लगेच समजू शकले नाही.

हेही वाचा >>>शुल्क न भरल्याने विद्यार्थ्याला चार महिन्यांपासून वर्गात बसू दिले नाही; सोलापुरात ‘त्या’ इंग्रजी शाळेवर दुसऱ्या पालकाचा आरोप

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी फिर्यादी नारायण व त्यांच्या पत्नी पार्वती दोघे दुचाकीवर बसून मौजे पाच पिंपळे (ता. परांडा, जि. धाराशिव) येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले होते.दुपारी .१२.२० वाजेच्या सुमारास त्यांची सून कौशल्या ऊर्फ कोमल हिचा त्यांना फोन आला व रडत तिने आपण मुलगा प्रणवचा खून केल्याची अविश्वसनीय माहिती दिली. तेव्हा धक्का बसलेल्या नारायण चोपडे यांनी कौशल्याचा भाऊ नवनाथ जगताप (रा. कुर्डू, ता. माढा) आणि आपला मुलगा गणेश (मयत मुलाचे वडील) यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि त्या दोघांना तात्काळ घरी जाण्यास सांगितले.दरम्यान, गणेश हा घरी धावून आला असता घरातील भयानक दृश्य पाहून तो पार कोसळला. पत्नी कौशल्या कु-हाडीने मारून दोन तुकडे केल्याचे भीषण चित्र त्याला पाहायला मिळाले.