गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येईल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विषयीची माहिती देत त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे. बाळू धानोरकर हे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसचे राज्यातील ते एकमेव खासदार होते. काही दिवसांपासून बाळू धानोरकर आजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने २८ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर, आज पहाटेच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय ४७ होते. खासदार बाळु धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. अंतिम संस्कार वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होईल. काही महिन्यांपूर्वी त्यांनी नवी कार खरेदी केली होती. भद्रावती येथे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पोटाला व कंबरेच्या भागाला गंभीर दुखापत झाली. मात्र या दुखापतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. पोटदुखी वाढल्यानंतर नागपुरात अरिहंत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. या अपघातात स्वादुपिंडाला जबर दुखापत झाली. तीच पुढे गंभीर होत गेली. हेही वाचा >> “चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांना शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना वडिलांचंही चार दिवसांपूर्वी निधन खासदार बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचं चार दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन बाळू धानोरकरांनी घेतलं. परंतु, प्रकृती अस्वास्थतेमुळे ते अंतिम संस्काराला जाऊ शकले नाहीत. अखेर, आज पहाटे बाळू धानोरकर यांचंही निधन झालं. पिता-पुत्र्याच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा >> “चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांना शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना राजकीय कारकिर्द चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावचे स्थायिक बाळू धानोरकर हे मुळचे शिवसैनिक. स्थानिक पातळीवर जम बसवल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडूनच आमदारकी मिळवली. संघटना मजबूत करत चंद्रपूरमध्ये धानोरकरांनी शिवसेना बळकट केली. तर, २०१९ च्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांना काँग्रेसमधून खासदारकीचं तिकिट मिळालं. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा मतदारसंघातही त्यांनी आपली जादू दाखवली. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. भाजपाच्या बालेकिल्ल्यात त्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला. एवढंच नव्हे तर, पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाही विधानसभेत निवडून आणले.