Shinde Shivsena Operation Tiger : राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलेलं असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही खासदार शिवसेनेच्या (शिंदे) स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार नागेश आष्टीकर आणि खासदार संजय देशमुख यांनी हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, यानंतर खासदार नागेश आष्टीकर यांनी माध्यमांशी संवाद साधत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला आपण का उपस्थित राहिलो? यांचं स्पष्टीकरण दिलं. तसेच या कार्यक्रमादरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

खासदार आष्टीकर काय म्हणाले?

“आम्ही एका सभागृहात काम करतो. त्यामुळे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम असल्याने त्यांनी आम्हा सर्वांना जेवणासाठी या अशी विनंती केली होती. आमच्याकडेही वेळ होता, त्यामुळे गेलो होतो. पण मला त्यात काही गैर वाटत नाही. बाकी काही राजकीय चर्चा झालेली नाही. मी फक्त १० मिनिटे त्या ठिकाणी होतो. त्यामुळे मी त्या ठिकाणी फक्त गेलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या”, असं स्पष्टीकरण खासदार आष्टीकर यांनी दिलं आहे.

ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत. त्या चर्चा सुरू असतानाच तुम्ही मंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता खासदार आष्टीकर म्हणाले की, “हे ऑपरेशन टायगर कधीपासून सुरू आहे? आम्ही जेव्हा निवडून आलो, त्याच्या दुसऱ्या दिवसांपासून सुरू आहे. ते अजूनही सुरूच आहे?”

“प्रतापराव जाधव हे मंत्री आहेत. त्यामुळे वारंवार मंत्र्यांकडे काम असतं. आम्हाला जनतेने निवडून यासाठी दिलेलं आहे की आम्ही काहीतरी काम करू. त्यामुळे सगळ्यांशी मैत्री ठेवणं यात काही चुकीचं नाही. त्यामुळे कोणीही याबाबत काहीही विपर्यास करू नये. तसेच त्या स्नेहभोजनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. १० मिनिटांत काय राजकीय चर्चा होणार? मी स्नेहभोजनाला जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी खासदार संजय देशमुख हे उपस्थित होते”, असं खासदार आष्टीकर यांनी सांगितलं. तसेच ‘आमच्या पक्षातील (ठाकरे गट) खासदारांमध्ये कुठेही नाराजीनाट्य नाही’, असंही स्पष्टीकरण खासदार आष्टीकर यांनी दिलं आहे.