सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत कोकणातील शिवसेना आपण संपवली, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला. ते पुढे म्हणाले, आता यापुढे कोणाला थारा देणार नाही. आमच्या आडवे कोण आले तर, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.

खासदार राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना संपवल्याचा दावा केला. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील सर्व जागांवर भाजपचाच आमदार असेल त्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे सांगितले. राणे पुढे म्हणाले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मिळालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मी मात्र निमित्त आहे.

हेही वाचा >>> “सर्वांनी मिळून शेवटी…”; राजू शेट्टींचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “विश्वासघात…”

दरम्यान कणकवली येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर ‘वक्त आने दो, जबाब भी देंगे.. और हिसाब भी लेंगे.’ असा फलक लावण्यात आला होता. त्याच स्टाईलने ‘ हमारा वक्त आया है.. तुम्हारा वक्त आने भी नही देंगे ! तुम्हारे इलाके में आके तुम्हे ही जबाब देंगे..! ’ असा इशारा देणारा फलक कणकवलीत छत्रपती शिवाजी चौकात लावून भाजप कार्यकर्त्यानी प्रत्युत्तर दिले आहे. या फलकांमुळे महायुतीत वादाला नवे तोंड फुटले आहे.

दरम्यान, माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदार संघावर याआधीच दावा केला होता. त्यानंतर शिंदे गटाचे उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता फलक युद्ध पाहायला मिळाल्याने राजकीय वाद पेटला आहे. आता फलक युद्ध पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. या फलकमधून सामंत बंधूंना राणे यांनी इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.