अहिल्यानगर : जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कामगार रुग्णालय अहिल्यानगर शहर व परिसरातच व्हावे यासाठी आपण संघर्ष करू, वेळप्रसंगी आंदोलन करू असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन देत जागेची मागणी केली तसेच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले.
लंके यांनी सांगितले की, यापूर्वी कोणत्याही खासदाराने जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व्हावे, अशी संसदेत मागणी केली नाही, पाठपुरावा केला नाही. आपण विविध केंद्रीय मंत्र्यांना भेटून निवेदन दिले, मागणी केली. या प्रस्तावित महाविद्यालयासाठी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर छावणी परिषदेची, दौंड रस्त्यावरील बंद पडलेले टीसी सॅनाटोरिअमची (अरणगाव), देहरे, चास येथील जागा प्रस्तावित केल्या आहेत.
राजकीय अट्टहासातून जिल्ह्याच्या अन्य भागात हे महाविद्यालय वळवले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार लंके यांनी महाविद्यालय तत्काळ सुरू करण्यासाठी शिर्डीच्या रुग्णालयास जोडण्याच्या हालचाली असल्याचे सांगत, त्यास विरोध केला आहे. सर्वपक्षीय आमदारांनी नगर शहरातच हे महाविद्यालय व्हावे, असे पत्र पाठवण्याचे आवाहन केले आहे तसेच आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.
जिल्ह्याच्या विशिष्ट भागात हे महाविद्यालय नेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यादृष्टीने आपण भूमिका मांडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून शहर विकासासाठी महाविद्यालय शहरातच होणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्हा विभाजन झाले तर चांगलेच
विमानतळ व इतर महत्त्वाचे प्रकल्प शिर्डीकडे गेले, याकडे लक्ष वेधत खासदार नीलेश लंके म्हणाले, जिल्हा विभाजन झाले तर चांगलेच आहे. जिल्हा भौगोलिकदृष्ट्या खूपच मोठा असल्याने जिल्हा प्रशासनाला नियोजन करणे अवघड होते. विभाजन झाल्यास गाव पातळीपर्यंतचे नियोजन करता येईल. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही सोयीचे होईल.
पारनेरही नको
आपला तालुका पारनेर असला तरी व कार्यकर्त्यांची मागणी असली तरी वैद्यकीय महाविद्यालय पारनेरमध्ये नको, असे आपले मत आहे. याला कारण दळणवळणाच्या सुविधा, विद्यार्थ्यांची गैरसोय. नगर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, मध्यवर्ती आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कुठल्याही कोपऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय नेले जाऊ नये, असे खासदार लंके म्हणाले.