Nilesh Lanke on Sweden MP Nila Vikhe Patil: जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांची पुतणी निला विखे पाटील या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून त्यांनी प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात त्यांची चर्चा झाली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पुतणीचे सोशल मीडियावर कौतुक केले. तर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले की, अहिल्यानगरमध्ये हरलो असलो तरी स्वीडनमध्ये विखे पाटील जिंकले आहेत. यानंतर निला विखे पाटील यांनी पीटीआयशी बोलताना विखे पाटील यांना टोला लगावला होता. यानंतर आता विखे पाटील यांचे जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी खासदार निलेश लंके यांनीही एक्स पोस्टद्वारे त्यांना डिवचले आहे.
विखे पाटील पिता-पुत्रांनी निला पाटील यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र या दोन कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून संवाद नसल्याचे निला विखे पाटील यांनी सांगितले. पीटीआयला प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “गेल्या दशकभरात ज्यांच्याशी माझा कोणताही संबंध राहिलेला नाही, ते आज माझ्या राजकीय यशाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत.”
सुजय विखे पाटील यांच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “कोणीतरी मला एक व्हिडिओ पाठवला, ज्यामध्ये सुजय विखे पाटील सांगताना दिसत आहेत की, महाराष्ट्रात भलेही विखे पाटलांचा खासदार पराभूत झाला असला, तरी कुटुंबाने स्वीडनमध्ये आपला खासदार निवडून आणला आहे. हे ऐकून मला अत्यंत आश्चर्य वाटले.”
“गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळात माझा काका किंवा चुलत भावाशी कोणताही संपर्क आलेला नाही. मी नियमितपणे भारतात जात असते, पण आता मी खासदार झाल्यानंतर ते माझ्या यशाचे कौतुक करताना दिसत आहेत”, असा दावा निला यांनी केला.
निलेश लंकेंनी डिवचले
पारनेरचे माजी आमदार असलेले निलेश लंके हे २०२४ च्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या विरोधात अहिल्यानगर लोकसभेतून निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणुकीस उभे होते. त्यांचा या निवडणुकीत निभाव लागणार नाही, अशी अटकळ बांधली जात असतानाच त्यांनी आश्चर्यकारक विजय मिळवत सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.
विखे पाटील कुटुंब आणि निलेश लंके यांच्यात वाद असल्यामुळेच लंके यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवत त्यांना आव्हान दिले होते. ज्यात ते यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले.
निला विखे पाटील यांच्या ताज्या विधानानंतर लंके यांनी एक्सवर लिहिले, “आपले कर्तुत्व एवढे मोठे करा की, कालपर्यंत ओळख न देणाऱ्यांनी आज तुमचे नाव घेऊन स्वतःचा मोठेपणा सांगितला पाहिजे!” पुढे लंके म्हणतात, “अभिनंदन अहिल्यानगरची सुपुत्री ‘स्वीडन खासदार’ निला अशोक विखे पाटील.”
निलेश लंके पाटील यांनी या पोस्टमध्ये विखे पाटील पिता-पुत्रांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख त्यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.
निला विखे पाटील कोण आहेत?
निला या शिक्षण तज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आणि आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची उभारणी करणारे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या पणती, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांची नात व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांची पुतणी आहेत.
दि. १३ सप्टेंबरच्या निवडणुकीत स्टॉकहोम शहर मतदारसंघातून ४१ वर्षीय नीला विखे पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून काम करतांना अर्थ, कर व गृहनिर्माण विषय हाताळले आहे. स्टॉकहोम सिटी कौन्सिलवर त्यांची निवड झाली. त्यांनी शहरातील ग्रीन पार्टीच्या निवडणूक समितीत काम केले. निला यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास केला असून, माद्रिद येथील कॉम्प्लुटेन्स विद्यापीठातही शिक्षण घेतले आहे.
नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला तरी त्यांचे बालपण अहिल्यानगरमध्ये गेले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी युरोपमध्ये शिक्षण घेतले. नीला यांच्या स्वीडिश संसदेतील प्रवेशाने विखे कुटुंबाच्या कार्याचा प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.
