Omraje Nimbalkar Reaction on Pavanraje Nimbalkar murder case verdict: शिवसेनेच्या (ठाकरे) चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या चर्चेत आहेत. ठाकरे गटाशी बंडखोरी आणि वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल यामुळे त्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले होते. या खटल्याचा निकाल लागल्यानंतर आपण निर्णय घेऊ, असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले होते. यानंतर आज या खटल्याचा निकाल लागला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची २० वर्षांपूर्वी हत्या झाली होती. या प्रकरणाचा निकाल आज विशेष सीबीआय न्यायालयाने दिला. या खटल्यातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष सुटका केली.

या निकालानंतर टीव्ही ९ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर यांनी सदर निकाल दुर्दैवी असल्याचे म्हटले. “२० वर्षांपासून या खटल्यातील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. न्यायालयाच्या निकालावर मी प्रतिक्रिया देणार नाही. यापुढे आम्ही उच्च न्यायालयात यासंबंधी दाद मागू. तिथे आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

what is the pawanraje nimbalkar murder case
महाराष्ट्रातलं पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमकं काय? २० वर्षांपूर्वी काय घडलं होतं? ओमराजे काय म्हणाले?

‘कलियुग आहे. कलियुगात वाईटाला अधिक बळ मिळते आणि चांगल्याला लवकर यश मिळत नाही’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी दिली.

शिंदे गटात प्रवेश करणार का?

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे, त्यामुळे आता पक्षांतर करण्याचा निर्णय बदलणार का? असा प्रश्न यावेळी ओमराजे यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “मी मतदारंसघात जाऊन सर्वांशी चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय घेईल. माझा अंतिम निर्णय झालेला नाही. या खटल्याचा आणि माझ्या त्या निर्णयाचा काहीही संबंध नव्हता. मला मतदारसंघातील लोकांची भावना जाणून घ्यायच्या आहेत.”

शिंदे गटात जाण्याबाबत ओमराजे निंबाळकर म्हणाले, ऑपरेशन टायगरबाबत मला काही कल्पना नाही. मी यापूर्वीही कधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोललो नाही. आताही बोलणार नाही आणि भविष्यातही कधी बोलणार नाही. माझी राजकीय भूमिका काय असेल, हे मी माझ्या लोकांबरोबर बोलून ठरवेल.

“निकाल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. २० वर्षांपासून माझे कुटुंब वडील पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, या भूमिकेतून न्यायालयीन लढा लढत होतो. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा निर्णय होता. तसेच माझी राजकीय कारकिर्द हा भाग माझ्या मतदारसंघाशी जोडलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी, लोकांशी चर्चा करून निर्णय घेईल”, असेही खासदार ओमराजे निंबाळकर यावेळी म्हणाले.

पवनराजे निंबाळकर यांची हत्या कशी झाली?

३ जून २००६ रोजी काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर हे मुंबईत आले होते. त्यांचे काम संपल्यानंतर ते पुण्याच्या दिशेने निघाले. निंबाळकर जेव्हा कळंबोली या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना तिथे एका व्यक्तीशी बार्शी येथील जमिनीच्या व्यवहाराबाबत चर्चा करायची होती. पवनराजे पांढऱ्या कारने कळंबोलीतील चार रस्ता भागात पोहचले, तिथे पवनराजेंवर हल्ला करण्यासाठी मारेकरी आधीपासूनच पाळत ठेवून होते, असे सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे.