scorecardresearch

“शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळताच ठाण्यातल्या शाखा…” राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंवर आरोप

खासदार राजन विचारे म्हणाले की आमच्यावर कितीही केसेस टाकल्या तरीही आम्ही गप्प बसणार नाही

What Rajan Vichare Said About Eknath Shinde?
खासदार राजन विचारे यांनी काय म्हटलं आहे जाणून घ्या

मागच्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रात गलिच्छ दडपाशाहीचं राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला प्रॉपर्टीबाबत कुठलाही मोह नाही. मात्र लोकमान्य नगरची शाखा त्यांनी ताब्यात घेतली आहे. शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळताच ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून राडा सुरू झाला आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राजन विचारे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आणखी काय म्हटलं आहे राजन विचारे यांनी?

ठाण्यातली लोकमान्य नगरची शाखा १९७३ मध्ये सुरू करण्यात आली आहे. ५० वर्षांपूर्वीची ही शाखा आहे. या लोकांनी बाप चोरले, आता शाखाही बळकवत आहेत. शिवसेना संपवायला निघाले आहेत असाही आरोप राजन विचारे यांनी केला आहे. एवढंच नाही तर स्वतःच्या कर्तृत्त्वावर काहीतरी करून दाखवा असाही टोला राजन विचारेंनी लगावला. एवढंच नाही तर जे काही प्रकार सुरू आहेत त्यानंतर आम्ही पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे. आमच्यावर कितीही केसेस टाकल्या तरीही आम्ही घाबरत नाही आम्ही गप्प बसणार नाही असंही राजन विचारे यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव

एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. त्यानंतर आज अधिवेशन सुरू झाल्यावर एकनाथ शिंदे गटाकडून म्हणजे शिवसेनेकडून ५५ आमदारांना व्हिपही बजावण्यात आला. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आम्ही कुठल्याही मालमत्तेवर हक्क सांगणार नाही बाळासाहेब ठाकरेंचे विचार हीच संपत्ती आहे असं म्हटलं होतं. आता राजन विचारे यांनी मात्र एकनाथ शिंदेंवर शाखा बळकवण्याचा आरोप केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी विधान भवनातील शिवसेना कार्यालयावरही हक्क सांगितला आहे. आजच आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीकाही केली. ते म्हणाले एकनाथ शिंदे यांनी कितीही कारणं दिली तरीही ते गद्दारच आहेत आणि गद्दारच राहणार. विरोधक सरकारला अधिवेशनात घेरणार हे दिसून येतंच आहे. अशात आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे ठाण्यातल्या शाखा बळजबरीने बळकावत असल्याचा आरोप केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 19:53 IST