मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूर आणि नासिकनंतर आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी नांदेडमधून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. नांदेडमध्ये जमलेल्या मराठा आंदोलकांसमोर बोलताना खासदार संभाजी राजे भोसले यांनी आज राज्य सरकारवर आणि विशेषत: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी राज्य सरकारने पाठवलेलं १५ पानांचं पत्र देखील आपण स्वीकारत नसल्याचं खासदार संभाजी राजे भोसले यांनी सांगितलं आहे. हे पत्र आपण का अस्वीकार करतोय, याची देखील कारणं यावेळी संभाजीराजेंनी उपस्थितांना सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“…हा छत्रपती संभाजीराजे इथे बसलाय!”

“समाजाला दिशाहीन करणं हे चालणार नाही. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती इथे बसला आहे. मला एक पत्र आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १५ पानी पत्र पाठवलंय. त्यात समाजासाठी काय काय करतोय, हे लिहिलंय. त्यांनी आंदोलनाची दखल घेतली, ही चांगलीच गोष्ट आहे. पण या १५ पानी पत्रामध्ये अनेक तफावती आहेत”, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले.

“तुम्हाला पत्रच पाठवायचं होतं, तर…”

“या १५ पानी पत्रात अनेक तफावती आहेत. पहिलं मूक आंदोलन कोल्हापूरला झालं, दुसरं मूक आंदोलन नासिकला झालं. तिथे तुमच्याइतकी गर्दी नव्हती. नांदेडकरांचा नाद करू शकत नाही. त्या मूक आंदोलनाला सगळे मंत्री, आमदार, खासदार आले होते. नासिकच्या आंदोलनालाही लोकप्रतिनिधी आले. ओबीसी समाजाचे मंत्री छगन भुजबळ देखील तिथे आले. आजही खासदार-आमदार आलेत. मग तुमचे पालकमंत्री कुठे आहेत? तुम्हाला जर प्रामाणिकपणे हे पत्र द्यायचं होतं, तर पालकमंत्र्यांच्या हातून द्यायचं होतं. ते मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आम्ही हे पत्र स्वीकारत नाही”, असं संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

“मला हे पत्र पटत नाही. १५ जुलैला सरकारचा एक जीआर निघाला. सरकारने सांगितलं की ज्यांना २०१४पासून कोविडच्या संकटापर्यंत ज्यांना नियुक्त्या दिल्या आहेत, त्यांना रुजू करून घ्या. समाजाचे लोक खूश झाले. लोक अधिकाऱ्यांकडे गेले, की म्हणतात, तुमचं आरक्षण रद्द झालंय, तुम्हाला नोकरी कशी द्यायची. मग हा जीआर काढून काय फायदा? सरकार या बाबतीत झोपलंय का? त्या जीआरचा काय फायदा?” असा सवाल संभाजीराजे भोसले यांनी केला.

“ज्यांची निवड झाली, पण त्यांना अजून नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्या मुलांवर अन्याय चालणार नाही. या पत्रात तुम्ही यावर काही लिहिलंय का? या गरीब मराठ्यांची काय चूक आहे?” असं देखील संभाजीराजे यावेळी म्हणाले.

कुठे आहेत नांदेडचे पालकमंत्री?

“१४-१५ ऑगस्टला २३ वसतिगृहांचं उद्घाटन करणार असं अशोक चव्हाण म्हणाले. १५ ऑगस्टला एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या प्रयत्नातून वसतिगृह सुरू करून त्याचं उद्घाटन केलं. या २३ पैकी मागच्या सरकारने बरेच केले आहेत. नाशिक, कोल्हापूर, बीड, पुणे हे वसतिगृह मागच्या सरकारनेच केले आहेत. मग तुम्ही काय केलं? तुम्ही काही केलं नाही, म्हणून तुम्ही इथे आले नाहीत, असं आम्ही समजायचं का?” अशा शब्दांत संभाजीराज भोसले यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

“संभाजीराजे ५० टक्क्यांवर का बोलत नाहीत? असं बोलतात. मागच्या सरकारने निर्णय घेतला की ज्यांना आरक्षण दिलं जातंय, त्यांना धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार. आत्ताच्या सरकारने देखील हेच सांगितलं. राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब देखील हेच म्हणाले. जो माणूस वंचित आहे, त्या सगळ्यांना टिकणारं आरक्षण मिळायला हवं, असं माझं म्हणणं आहे. त्यासाठी माझा हा लढा आहे. ही सरकारची जबाबदारी आहे.”

“आण्णासाहेब पाटील महामंडळावर अमुक रक्कम खर्च केली असं सरकार या पत्रात म्हणतंय. माझा प्रश्न आहे, ते तुम्ही दिलेले नसून ते आधीच्या सरकारने दिलेले आहेत. तुमचं महामंडळ देखील अजून स्थापित नाही. मग कशाला पत्र लिहिलं?” असं देखील संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sambhaji raje bhosale targets cm uddhav thackeray ashok chavan in nanded on maratha reservation pmw
First published on: 20-08-2021 at 12:57 IST