राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार विधान भवनात गेले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेतली ज्यावरुन संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. शिवसेनेचं मन शरद पवारांच्या कृतीमुळे दुखावलं आहे. शरद पवारांनी गद्दारांना प्रतिष्ठा देऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवार आदरणीय आहेत, पण…
शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत. आदरणीय आहेत, पण ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली घेऊन बैठका घेणं अशामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते. शरद पवार हे मोठे नेते आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला गद्दारी आणि भ्रष्टाचारी कीड लावली त्यांच्या दालनात जाऊन शरद पवारांनी बैठक का घेतली? संपूर्ण विधान भवन काय ओस पडलं होतं का? वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं म्हणजेच निष्ठावंत कार्यकर्त्याचं मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेणार नाही. आम्ही इतके सहिष्णू नाही, आमचं मन इतकं मोठं नाही. ज्यांचं मन मोठं आहे त्यांनी ते करावं पण आम्हाला ते मान्य नाही. ज्यांना पटत असेल त्यांनी ते करावं. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची विश्वासार्हता कमी होते असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या कृतीमुळे आम्ही सगळेच दुखावलो आहोत-राऊत
पुढे शरद पवारांबाबत संजय राऊत म्हणाले की शरद पवारांच्या कृतीमुळे आम्हीच काय सगळेच दुखावले आहेत. आम्ही असतो तर अजित पवारांच्या दालनात जाऊन बैठक घेतली नसती. कारण त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केली हे आम्ही लक्षात ठेवलं असतं आणि पथ्य पाळलं असतं. महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बुधवारी झालेली बैठक ही सीमा प्रश्नासंदर्भातली बैठक होती. त्या बैठकीत काय घडलं? हे समोर आलं नाही. राज्याच्या किती प्रमुख नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं? शिवसेना हा एक पक्ष आहे, सीमा प्रश्न चळवळीतला हा महत्त्वाचा घटक आहे. किती वर्षे झाली हा खटला प्रलंबित आहे? यावर तोडगा निघाला पाहिजे? काय चर्चा झाली? पुढच्या बैठकीची तारीख काय ठरली? हे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले. शरद पवार एकनाथ शिंदेंच्या दालनात जातात आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता ही बाब शिवसेनेला दुखावणारी आहे असंही राऊत म्हणाले.

शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत-संजय राऊत
शरद पवार हे गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत. शिवसेना शरद पवारांच्या कृती मुळे अस्वस्थ झाली आहे. तुम्ही जर गद्दारांना प्रतिष्ठा देत असाल तर तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याबाबत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही असंही संजय राऊत म्हणाले आणि त्यांचा संताप व्यक्त केला आहे. अजित पवारांनीही गद्दारीच केली, मग त्यांच्याविरोधात कोर्टात जाणं, भूमिका घेणं हे तुम्ही का केलंत? एकनाथ शिंदेंविरोधात आम्ही लढतो आहोतच ना. तुम्ही त्यांना प्रतिष्ठा का देता? आम्हाला ही बाब मनाला लागली आहे. शरद पवार आणि माझे संबंध अत्यंत प्रेमाचे आणि स्नेहाचे आहेत पण पक्षाच्या भूमिकेशी मी ठाम आहे. मोठे नेते गद्दारांना प्रतिष्ठा देत राहिले तर राज्याची बदनामी होणारच असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मी शरद पवारांशी मी कधीही बोलू शकतो. हा विषय आमच्यासाठी पक्ष म्हणून गंभीर आहे. ज्यांनी तुमच्याशी गद्दारी केली आहे त्यांच्या छताखाली जाऊन आम्ही बैठक घेणार नाही.
