मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ठाकरे बंधूंनी तिरंगा मोर्चा काढला आहे. मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये तिरंगा ध्वज हाती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप हे पक्ष सहभागी झाले आहेत. तसंच सीजेपीच्या कार्यकर्त्यांचाही यात सहभाग आहे. या मोर्चात सहभागी झालेल्या संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय?
आज मोर्चासाठी लोक ट्रेनने येत आहेत, चालत आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी हे आंदोलन आहे. देशभरात या आंदोलनाचा प्रभाव आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा हा मोर्चा निघतो आहे. डाव्या आघाडीचे नेतेही मोर्चात येत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देशाला संबोधित करतील. संविधान वाचवा या मोहिमेचं, आंदोलनाचा केंद्रबिंदू हा दिल्लीसह मुंबईतही असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ज्ञानेश कुमार हाच भाजपाचा बीएलओ आहे
ज्ञानेश कुमार हाच भाजपाचा बीएलओ आहे. ज्ञानेश कुमार त्यांचं सर्वस्व आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने देश लुटला जातो आहे. त्यामुळे आमचा मोर्चा हा ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आहे.भाजपाने निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांची वकिली करू नये. ते भ्रष्टाचाऱ्यांची आणि देशद्रोह्यांची वकिली करत आहेत. लोकांमध्ये आता खदखद निर्माण झाली आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आम्ही जे म्हणत आहोत ते इंडियन एक्स्प्रेसने छापलं आहे. जनमताच्या रेट्यामुळे भले भले हुकुमशहा यांचा अस्त झाला. जर ज्ञानु गेला नाही तर नरूभाई जाईल, त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आता ठिणगी पडल्यानंतर जनमताचा वणवा पेटला आहे. या वणव्यात सत्ताधाऱ्यांनाही जावं लागेल हे कुणी विसरू नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तटकरेंना हवा बदलाचा अंदाज आला पाहिजे-राऊत
सुनील तटकरे हे महायुतीत असल्याने त्यांना महायुतीच्या नेत्यांची भाषा बोलावी लागते आहे. त्यांनी जरा बदलत्या हवेचा अंदाज घेतला पाहिजे. आमचा मोर्चा हा लोकशाही वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
