निवडणूक आयोग वगैरे झूट आहे. निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना लफंगेगिरी करून चोरांच्या हातात ठेवली. हे लोकशाहीला व भारतीय संस्कृतीला धरून आहे का? शिवसेना कोणाची हे ते ठरवणार का? असा हल्लबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केला. शिवगर्जना अभियानाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या गुजर हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “खरी शिवसेना कुठली हे बघायचं असेल तर….” संजय राऊत यांचं भाजपा आणि एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान
पाच-पंचवीस खोकेवाले पैशाच्या बळावर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह विकत घेवू शकले. पण, ते जनतेचे प्रेम व हिंमत कशी विकत घेणार? शिवसेना कोणाची याबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय जनता मानायला तयार नाही. शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच असून, शिवसेना संपवली म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात फिरून पाहिल्यास त्यांना जनताच उत्तर देईल अशी टीका खासदार राऊत यांनी विरोधकांवर केली.
‘विधिमंडळाला चोरमंडळ’ असे संबोधल्याबद्द्ल आपल्याला विधीमंडळाची नोटीस आली आहे ना? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता राऊत म्हणाले की, गेली अनेकवर्षे एका वृत्तपत्राचा संपादक. विविध विषयांवर मी काम करत आहे. २० वर्षांपेक्षा जास्तकाळ मी संसदेमध्ये आहे. मला कोणते शब्द कोठे वापरायचे हे माहिती आहे. मराठी भाषा मला त्यांच्यापेक्षा जास्त समजते. जे चाळीस चोर ज्या पद्धतीने शिवसेनेशी बेईमानी करून पळून गेले आणि त्या चाळीस चोरांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेण्याचा प्रयत्न केला त्या चोरांच्या विषयी मी बोलत आहे. शिवसेना विधिमंडळ पक्ष जो काही होता तो त्यांनी फोडला. पक्ष फोडला नाही. आणि अशा चोर मंडळामुळे विधिमंडळाचीच प्रतिष्ठा खालावते असे माझे म्हणणे आहे.
हेही वाचा- “रोग हाल्याला अन् इंजेक्शन…”, ST कर्मचाऱ्याला निलंबन केल्यावरून अजित पवार शिंदे सरकारवर संतापले
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा काही निर्णय आहे का? खालच्या पातळीवर निर्णय देणे चालतात का? असे प्रश्न खासदार राऊत यांनी केले. आपण बोलताना शिवी वापरली असल्याबाबत विचारले असता आपण वापरलेल्या शब्दांना शिवी म्हणत नाहीत मराठीमध्ये मी वापरलेल्या शब्दाचा शब्दसंग्रहात काय अर्थ येतोय तो समजून घ्या. मराठी समजून घ्या आपण प्रेमानेही शिव्या देतो असे राऊत म्हणाले. नितेश राणे आपल्यावर सतत टीका करतात त्याबाबत आपण काय सांगाल असे छेडले असता त्यांचा मेंदू ढिल्ला झाला आहे. आणि त्यांचं सगळच ढिल्ल असल्याची खिल्ली खासदार राऊत यांनी उडवली.