Sanjay Raut On Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. यातच सात राज्यसभा सदस्यांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहेत, यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेत जावं अशी मागणी करण्यात येत आहे.
या घडामोडींवर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांची नेमकी भूमिका काय? याचाही खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. ‘त्यांनी (शरद पवार) मला सांगितलं की राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत’, असं संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
एप्रिलमध्ये राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत आणि जर महाविकास आघाडीतील गणित आपण पाहिलं तर तिन्ही पक्षाचा एखादाच उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसचं याबाबत काय मत आहे? शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जावेत का? असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला.
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही हा प्रश्न शरद पवारांना का विचारला नाही? शरद पवार हे धुरंधर राजकारणी आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून एक व्यक्ती राज्यसभेवर जाईल. कारण तिन्ही पक्षाचे काही लोक निवृत्त होत आहेत. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसू आणि याबाबत निर्णय घेऊ”, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांची भूमिका काय?
“माझी मध्यंतरी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याच्या विषयांच्या संदर्भात मी त्यांचं मत विचारलं. तेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं की राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत, असं त्यांनी मला सांगितलं. मग आता यावर आमच्या आघाडीतील तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहेत. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत आणि ६० वर्षांपेक्षा जास्त संसदीय कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जर ही भूमिका व्यक्त केली आहे आणि त्यांची ही भूमिका त्यांनी कॉग्रेसला देखील सांगितली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबाबत चर्चा होईल”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

