Shrikant Shinde on Maharashtra Assembly Election 2024: खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये केलेल्या भाषणामुळे नंतर महायुतीमध्ये बराच गुंता निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. महायुतीचं जागावाटप अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नसताना श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील जाहीर कार्यक्रमात हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर छगन भुजबळांची दावेदारी चर्चेत आली व बरेच दावे-प्रतिदावेही झाले. शेवटी बऱ्याच खलानंतर ती उमेदवारी हेमंत गोडसेंना देण्यात आली. आता पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेंनी केलेले जाहीर सूतोवाच चर्चेत आले आहेत. शिंदे गटाचे खासदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी सांगलीतल्या खानापूर (विटा) मतदारसंघातील आटपाडीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती. सुहास बाबर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने श्रीकांत शिंदेंनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी सुहास बाबर यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचं आहे, असं विधान श्रीकांत शिंदेंनी केल्यामुळे महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर झाल्याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काय चित्र असेल? (Photo - Loksatta Graphics Team) काय म्हणाले श्रीकांत शिंदे? श्रीकांत शिंदे यांनी आटपाडीतल्या कार्यक्रमात बोलताना सुहास बाबर यांचं कौतुक केलं. "आटपाडीसारख्या ग्रामीण भागातही आपण एवढी मोठी दहीहंडी आयोजित केली आहे. मी सुहास बाबर यांना शुभेच्छा देतो. पुढच्या दोन महिन्यांत आपल्याला विजयाची दहीहंडी साजरी करायची आहे. आज प्रचाराची दहीहंडी फुटली आहे. आज आमची बैठकही झाली. दोन महिन्यांनंतर आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची दहीहंडी फोडायची आहे. तेव्हा ८ थरांपेक्षा जास्त थरांची दहीहंडी आपल्याा उभी करायची आहे. सगळ्यात वर सुहास बाबर यांना चढायचं आहे", असं श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच, "आपल्या सगळ्यांना त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहायचं आहे", असंही श्रीकांत शिंदे म्हणाले. गोपीचंद पडळकरांचे बंधू इच्छुक? दरम्यान, एकीकडे श्रीकांत शिंदे यांनी सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून महायुतीकडून सुहास बाबर यांच्या उमेदवारीचे अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले असताना दुसरीकडे महायुतीचा भाग असणारे गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हेदेखील या मतदारसंघातून महायुतीतून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये खल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच! लोकसभा निवडणुकांच्या आधी श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात जाहीरणे हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित केली होती. मात्र, तोपर्यंत महायुतीचं अधिकृत जागावाटप निश्चित झालेलं नव्हतं. त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये बराच खल झाल्याचं पुढे दिसून आलं. छगन भुजबळ या जागेसाठी इच्छुक असल्याचंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र, सरतेशेवटी झालेल्या अंतर्गत चर्चांनंतर हेमंत गोडसे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली.