Ramdas Kadam Statement targets Uddhav Thackeray : ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय पाटील, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे सहा खासदार आज ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. सध्या हे खासदार मुंबईत दाखल झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन येथे पोहोचले आहेत. दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे)पक्षाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सहा नाही तर सात खासदारांच्या स्वाक्षरीचं पत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी ते बोलत होते.
आमदार-नगरसेवकही संपर्कात
ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार मुंबईत दाखल झाले असून ते आज शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याबाबत शिक्कामोर्तब झालं आहे. यावर रामदास कदम म्हणाले, “ये तो झांकी है, और बहोत कुछ बाकी आहे. आमदार (फुटीच्या मार्गावर) आहेत. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकही संपर्कात आहेत. आता मी नावं सांगणार नाही. “
सहा नाही सात खासदारांची सही
उद्धव ठाकरेंच्या पक्षातून सात खासदार बंडखोरी करणार असल्याचं सुरुवातीला समोर आलं होतं. मात्र, सहा खासदारांचीच नावे समोर आली. आता, रामदास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा नव्हे तर सात खासदारांनी स्वाक्षरी केली आहे. याबाबत ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या बाजूला जे बसत आहेत, ते त्यांना फसवत आहेत. सहा नाही, सातव्या खासदाराचीही सही आहे. हे मी जबाबदारीने बोलतो आहे. त्यांनी मंत्रिपद मागितलं. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते परत गेले आणि आता ते उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसत आहेत. उद्धव ठाकरेंना माणसांची ओळख नाही.”
“ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ नये म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला. ओमराजे निंबाळकर यांना रात्री काही लोकांनी भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाठवलं गेलं होतं. पण निंबाळकरांनी त्यांना चोख उत्तर दिलं. मला आज एकनाथ शिंदे यांचा खूप अभिमान वाटतोय. कारण, त्यांनी जो निर्णय घेतला त्याची आज अंमलबजावणी होत आहे. आज चार वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सहाही खासदारांचा प्रवेश होणार आहे. कालच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की मी कोणतंही ऑपरेशन अर्थवट करत नाही”, असंही रामदास कदम म्हणाले.
