‘त्या’ व्यक्तीचा तर निषेध आहेच; परंतु अशांना संधी देणारे देखील तितकेच जबाबदार : खासदार पाटील

आमदार गोपीचंद पडळकरांसह भाजपावर केली टिका

प्रतिकात्मक छायाचित्र

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आमदार झालेल्या गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका निंदनीय आहे. दोन ते तीन पक्ष व त्यांच्या विचारधारा बदलून भाजपामध्ये प्रवेश केलेले व त्याची बक्षीस म्हणून मागच्या दाराने आमदारकी मिळवणाऱ्यांनी शरद पवारांवर हीन दर्जाची टीका केली असून, त्या व्यक्तीचा तर निषेध आहेच; परंतु अशा लोकांना संधी देऊन विधिमंडळासारख्या पवित्र वास्तूमध्ये आणणारे देखील तितकेच जबाबदार आहेत, अशी टिका खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली.

महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर झाली आहे. त्यांचे वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी देखील तीच शिकवण आयुष्यभर जोपासली. त्यांच्यावर पडळकर हे हीन व विकृत दर्जाची टीका करतात ते अतिशय निंदणीय आहे, ते संतापजनकही आहे. विकृत विधान करणाऱ्या व्यक्तीने केवळ दोन- तीन वर्षांच्या आतच स्वार्थापोटी समर्थकांना वाऱ्यावर सोडले. आराध्य देवतेच्या खोट्या शपथा वाहिल्या. दोन ते तीन पक्ष व त्यांच्या विचारधारा बदलून त्याची बक्षीस म्हणून मागच्या दाराने आमदारकी मिळविली. अशा व्यक्तीचा तर निषेध करत आहोतच; पण त्यांना संधी देऊन विधिमंडळासारख्या पवित्र वास्तूमध्ये आणणारे देखील त्याच कृतीला तितकेच जबाबदार आहेत. विरोधकांच्या टीका, टिप्पणी करण्याच्या अधिकाराचा व यशवंत विचारांचा महाराष्ट्राने नेहमीच सन्मान केला आहे; पण असभ्य व असंस्कृत भाषा वापरून त्याला कलंक लावू नका, असेही खासदार पाटील यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- … आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला – जितेंद्र आव्हाड

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- “भाजपाच्या ‘या’ नेत्याने चंद्रकांत पाटलांना चंपा असं नाव ठेवलं”; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.असं पडळकर म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mp srinivas patil criticizes mla padalkar and bjp msr

ताज्या बातम्या