Sunil Tatkare On Local Body Election : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सध्या जाहीर झालेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच महायुतीमधील पक्ष काही नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत.
यातच काही दिवसांपूर्वी रायगडमधील म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह नऊ नगरसेवकांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मात्र, या संदर्भात बोलताना सुनील तटकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना आता मोठा इशारा दिला आहे. ‘यापुढे गद्दारांना माफी नाही’, असं सुनील तटकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
“कोण कोणाचा आसरा घेण्यासाठी गेलं असेल, किंवा आणखी कशासाठी गेलं असेल. पण यापुढे गद्दारांना माफी नाही हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती होईल. पण कोणी कोणाला वाचवण्यासाठी येऊ शकत नाही. कारण नितीमत्ता असावी लागते”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तसेच पक्ष सोडून गेलेल्यांवर पक्षातर्फे कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही तटकरे यांनी म्हटलं आहे.
सुनील तटकरेंना धक्का
काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह ९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना धक्का बसला आहे. या नाट्यमय घडामोडी नुकत्याच घडल्या होत्या. त्यामुळे मंत्री गोगावले यांनी यांचा तटकरेंना शह दिल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, म्हसळा नगरपंचायत येथील नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत आणि एकूण नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
