Supriya Sule Daughter Revati Sule : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि संसदपटू सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपूत्र सारंग लखानी यांच्याबरोबर रेवती विवाहबंधनात अडकणार आहेत. सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे आणि त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी या लग्नाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आता खुद्द सुप्रिया सुळे यांनी होणाऱ्या जावयाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत या लग्नाची माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांच्या लग्नाच्या निमित्ताने पवार आणि सुळे कुटुंबीयांच्या घरात सनई चौघडे वाजणार आहेत. याबाबत सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत रेवती आणि सारंगच्या लग्नाची माहिती दिली होती. तसंच, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनीही रेवती सुळे यांच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. रेवतीचं लग्न कोणाबरोबर होणार? होणारा पती काय करतो? याबाबत प्रश्न विचारले जात असतानाच सुप्रिया सुळे यांनीही थेट जावयाचे फोटो शेअर करत त्याच्या आई-वडिलांचीही माहिती दिली.

सुप्रिया सुळे पोस्टमध्ये म्हणाल्या, “सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमची मुलगी रेवती हिचा विवाह अरुण लखानी आणि वंदना लखानी यांचा सुपूत्र सारंग याच्याशी निश्चित झाला आहे.”

कोण आहेत सारंग लखानी?

सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. पाणी शाश्वत प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासात ही कंपनी कार्यरत आहे. गेल्या आठ वर्षांपासून सारंगही या कंपनीचं काम पाहत असून ते कार्यकारी संचालक पदी आहेत. कौटुंबिक व्यवसायात सक्रिय होण्याआधी त्यांनी बिझनेस डेव्हलोपमेंट कन्सल्टंट म्हणून मॉडर्न हायड्रोजन कंपनीत काम केलं होतं.

तर, रेवती सुळे हिने प्रतिष्ठित ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून पदवी पूर्ण केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात रेवती सुळे या राजकारणात सक्रिय नाहीत, मात्र बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी पहिल्यांदाच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. शरद पवारांची नात नागपूरची सुन होणार असल्याने अनेक चर्चाही रंगल्या आहेत.

दरम्यान, रेवती आणि सारंग यांचा विवाहसोहळा कसा होणार? तारीख, स्थळ, वेळ याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.