वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर येणार की नाही? याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज (२६ मार्च) या संदर्भात भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील सहभागाबद्दल भाष्य केले आहे. पुढील एक दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल. मात्र, आपल्याला याबाबत अधिक माहिती नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“वंचित बहुजन आघाडीचे महाविकास आघाडीबरोबर येण्याचे काय झाले? याबाबत एकदोन दिवसांत माहिती समोर येईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मी उपस्थित नव्हते. त्यामुळे ‘वंचित’बाबत जयंत पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात हे नेते सविस्तर सांगू शकतील. आज किंवा उद्या पुन्हा बैठक होणार आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा : रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होईल?

“महाविकास आघाडीचे जागावाटप दोन दिवसांत पूर्ण होईल. आमच्याकडे कोण लोकसभा लढविणार हे सर्वांना माहिती आहे. आम्ही लोकशाही मार्गाने काम करत आलो आहोत.” दरम्यान, विजय शिवतारे यांनी बारामतीमधून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “लोकशाहीमध्ये चर्चा करण्याचा आणि निवडणुका लढण्याचा अधिकार सर्वांना आहे. बारामतीमधील लोकांच्या आशिर्वादामुळे मी तीन वेळा निवडून आले आहे. आज बारामतीमध्ये पाण्यासह अनेक प्रश्न गंभीर आहेत. दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्य सरकारने दिल्ली वाऱ्या बंद करून दुष्काळाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढविणार

अकोला मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. २७ मार्चला प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून ते अर्ज भरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होणार की नाही? यासंदर्भात दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp supriya sule on vanchit bahujan aghadi and maha vikas aghadi alliance lok sabha election 2024 gkt
First published on: 26-03-2024 at 13:06 IST