शिवेंद्रसिंहराजे यांचे माझ्यावर भरपूर प्रेम आहे. त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसही जात नाही. मी माझा इतका प्रचार करत नाही, तितका ते माझा प्रचार करतात. माझे ते मुख्य प्रचारक आहेत, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेना खोचक टोला लगावला आहे .

कास महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर पत्रकारांनी खासदार उदयनराजेंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी महोत्सवावर केलेल्या टीकेला आपल्या वेगळ्या शैलीत उत्तर दिले. खासदार उदयनराजे म्हणाले, अशा प्रकारचा महोत्सव ज्यांना माहिती नाही, त्यांच्यापर्यंत या महोत्सवाचा प्रसार होईल त्यावेळी लोक मोठ्याप्रमाणात येतील. आता तर प्रत्येक शनिवार, रविवारी पाचगणी महाबळेश्वरला राहायला जागा मिळत नाही. तेथे पावसाळ्यातही पर्यटक येतात. तसाच हा कास परिसर आहे. कास महोत्सव हा पर्यटनाला चालना देण्याचा एक प्रयत्न आहे.या महोत्सवासाठी मी पुढाकार घेतला आहे. अशी कल्पना आरोप करणाऱ्यांना का सूचली नाही, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, आमदार शिवेंद्रसिंहराजेंना यायला हवे होते. अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव घेतलं असतं. त्यांच्या मनात कुठून असा विचार आला, कशासाठी आला. जिल्हा प्रशासन ज्यावेळी महोत्सवासाठी निधी खर्च करते तो कार्यक्रम शासकियच आहे.

या परिसराचा विकास व्हावा, निधी उपलब्ध व्हावा,म्हणून आम्ही सर्व करत आहोत. पण ते या सगळ्यावर टीका करत आहेत. जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माझे सांगणे आहे की, ज्या ज्या लोकांनी झाडे तोडली त्यांची चौकशी करा. त्यांना कामाला लावा, असे सांगून उदयनराजे म्हणाले, जे टीका करतात त्यांच्याच कार्यकर्त्यांची ही हॉटेल्स आहेत. प्रत्येकवेळी पैसा, पैसा, पैसा काय करायचे या पैशाचे. यातून पैसे मिळणार असते तर मी कळकाचा व कमानीचा ठेका घेतला असता, असे ही ते मिश्किलपणे म्हणाले.

शिवेंद्रसिंहराजे सातत्याने प्रत्येक चांगल्या कामावर टीका करत आहेत. त्यांना माझे नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसही चांगला जात नाही. मी माझा इतका प्रचार करत नाही, तितका ते माझा प्रचार करतात. माझे ते मुख्य प्रचारक आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. आरशापुढे उभे राहिलो तर मी माझं एक वेळ नाव विसरेन.पण ते आरशासमोर उभे राहिले तरी भांग पाडताना त्यांना माझं नाव दिसते. कास महोत्सवानिमित्त संदेश देताना उदयनराजे म्हणाले, आपल्याला जिवंत राहायचे असेल तर झाडे लावा, झाडे जगवा. ज्या दिवशी झाडे संपतील त्यादिवशी आपले जीवन संपणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे असेही उदयनराजे म्हणाले.