सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटीसंदर्भात जो निर्णय दिला होता तो कायद्याद्वारे रद्दबातल करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली. तीच तत्परता केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने मराठा आरक्षणासाठी का नाही दाखवली, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे. सरकारने मराठा आरक्षणासाठी वेळीच पावले उचलली असती तर आज लोकांना जीव गमवावा लागला नसता, असे त्यांनी म्हटले आहे.

खासदार उदयनाराजे भोसले यांनी पुण्यात शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी निघणारे मोर्चे थांबले पाहिजे, असे सांगितले जाते. पण जर वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळच नसती आली, असे ते म्हणाले.

मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणार का, असा प्रश्न विचारला असता उदयनराजे म्हणाले, आम्ही मराठा आरक्षण परिषद घेऊन सर्वांची मते विचारात घेऊन पुढील दिशा ठरवू. मी नेता नाही, यात कोणतेही नेतृत्व नाही, पण मराठा समाजाला न्याय मिळवून देणे महत्त्वाचे आहे. परिषदेत जो निर्णय होईल त्यासाठी मी बांधील असेल, असे त्यांनी सांगितले.

‘मला यात पक्षाचा विषय नको. कोण काय बोलले याला महत्त्व नाही. अजून किती टोलवाटोलवी करणार, उद्या धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण असेल?’, असा प्रश्न त्यांनी विचारला. १७ लाख लोकं मतदान करतात त्यावेळी एक खासदार तर अडीच ते तीन लाख लोक मतदान करतात त्यानेळी एक आमदार निवडून जातो हे सर्वांनी लक्षात ठेवावे. लोकांच्या विश्वासाला तडा दिला, तर जनतेने विश्वास कोणावर ठेवावा. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी काय पावले उचलणार हे जनतेला सांगावे, असे त्यांनी सांगितले.  लोकप्रतिनिधी कायदे तयार करतात आणि त्यात बदलही करु शकतात, मग मराठा आरक्षणाकडे का दुर्लक्ष केले जाते, असा सवाल त्यांनी विचारला.

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले असून ते गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा याचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader