सातारा: लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले रात्री एकत्र आले. लोकसभा निवडणुकीत आलेले अनुभव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये बैठक झाली. जिल्ह्यात कोणत्या विधानसभा मतदारसंघात काय भूमिका घ्यायची यावर रणनीती आखण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्या दोघांच्याही सूत्रांनी दिली. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत शांततेची भूमिका घेण्याबाबत व कार्यकर्त्यांना तशा सूचना देण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक आमदारांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. गणेशोत्सवात मंडळांना भेटी देणे, आरतीला उपस्थित राहणे, देणगी देणे आमदारांकडून व इच्छुकांकडून सुरू आहे. आमदार महेश शिंदे यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. दोघांमध्ये काही चर्चाही झाली. यानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे एकत्र आले. त्यांनी विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा केली. जिल्ह्यात, सातारा व जावली तालुक्यात लोकसभा निवडणुकीत आलेले अनुभव, जिल्ह्याचे सध्याचे राजकारण यावर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचाराची मोहीम राबवली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार साताऱ्यातील काही विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल. भाजपला व महायुतीच्या उमेदवारांना काय त्रास होऊ शकतो यावरही चर्चा झाली. मागील अनेक वर्षांच्या वादानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे खासदार उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी आले होते. यावेळी भाजपाचे लोकसभा समन्वयक सुनील काटकर उपस्थित होते.

हेही वाचा >>>महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी; पटोले, धानोरकर, वडेट्टीवारांना पक्षश्रेष्ठींकडून पाचारण

लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. सातारा जावलीतून कसे मताधिक्य मिळाले, इतर ठिकाणाहून का नाही मिळाले. कोणी कोणती भूमिका घेतली. यावेळी आपण काय भूमिका घ्यायची, याची चर्चा झाली.विधानसभा अधिवेशनानंतर झालेल्या धावपळीमुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची तब्येत ठीक नव्हती. त्याची चौकशी उदयनराजेंनी केली. दोघांच्या भेटीची माध्यम प्रतिनिधींना कल्पना नव्हती. भेटीनंतर दोघांनी एका गाडीतून प्रवास केला. यावेळी गाडीचे सारथ्य उदयनराजेंनी केले. विरोधकांना शह देण्याचा याबाबत उद्देश असू शकतो अशीही चर्चा होती. शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना कॅडबरी भेट दिली. त्याचेही छायाचित्र समाज माध्यमांवर आले. एकूणच दोघांची झालेली भेट आणि त्यांच्याच झालेली चर्चा ही निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण समजली जाते.

भेटीमध्ये विकासकामांवर चर्चा. राजकारण हा विषय नव्हता. आम्ही दोघेही खूप दिवस भेटलो नव्हतो. त्यामुळे रात्रीच्या भेटीमध्ये सातारा शहर, तालुका आणि जावली तालुक्यातील विकासकामांवर चर्चा झाली. बैठकीत राजकारण हा विषय नव्हता. आम्ही दोघेही भाजपामध्ये आहोत आणि जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत यावर चर्चा झाली.- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, सातारा