गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदे हे समर्थन आमदारांसह गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. याबाबत भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

 “आजची जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. गेल्या दोन वर्षापासून ही खदखद सुरु होती. ज्या वेळी एका विचाराने लोक एकत्र येतात त्यावेळ त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची किंवा आमिष दाखवण्याची गरज लागत नाही. ज्यावेळी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचे उद्दिष्ट केवळ सत्ता स्थापन करण्याचे असते. सत्ता स्थापन केली ठीक आहे पण विचारसरणी वेगळी असल्यामुळे लोकांना एकत्र ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. हे लोक वेगवेगळ्या विचारांची असल्यामुळे फार काळ एकत्र राहत नाहीत. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे.

“ज्या वेळेस ते एकत्र आले तेव्हा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. मुळात हे सरकार टिकणार याचा विचार करायला पाहिजे होता. आज पाच सहा महिन्याच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थाचा कालावधी संपतल्या आहेत. तीन चार महिन्यांनी या सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. अशावेळी विचार केला तर शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विरोधक हे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. सत्तेची समीकरणे जुळणार नव्हतीच पण ती जुळवली गेली,” असेही उदयनराजे भोसले म्हणाले.