प्रथमेश देशमुख या एमपीएसीचा अभ्यास करणाऱ्या मुलाने आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज अभिजित दिपके यांनी प्रथमेश देशमुखच्या घरी जात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी प्रथमेशच्या आईने अभिजित दिपकेंसमोर टाहोच फोडला. प्रथमेश देशमुख हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील रहिवासी होता, तिथेच जाऊन अभिजीत दिपकेंनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
नेमकं काय घडलं?
प्रथमेश देशमुख नावाच्या २५ वर्षीय तरुणाने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परीक्षा पुढे जाणे, अनेक काळ निकाल न लागणे, म्हणावी तशी भरती न होणे आणि आता पेपरफुटीची प्रकरणे यामुळे एमपीएससी करणाऱ्या परीक्षार्थींमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. प्रथमेश देशमुख हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील रहिवासी होता. मागच्या दोन वर्षांपासून तो पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो आर्थिक अडचणीत सापडला होता. परीक्षेची तयारी करताना डोक्यावर झालेले कर्ज आणि त्यातच राहत्या खोलीचे भाडे थकल्यामुळे त्याने आयुष्य संपवल्याचा दावा केला जात आहे.
अभिजीत दिपकेंसमोर प्रथमेशच्या आईने फोडला टाहो
माझा मुलगा पुण्यात शिकायला गेला होता. त्याला अधिकारी व्हायचं होतं. प्रथमेश अधिकारी बनून लाल दिव्याच्या गाडीतून येणार होता. पण काल रात्री तो अॅम्ब्युलन्समधून आला, असा टाहोच प्रथमेश देशमुखच्या आईने अभिजीत दीपके यांच्यासमोर फोडला आहे. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या प्रथमेशने टोकाचं पाऊल उचलल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी आज धाराशिवमध्ये जाऊन प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. यावेळी प्रथमेशच्या आईने हा काळीज चिरणारा सवाल करताच सर्वच हेलावले.
अभिजीत दिपके या घटनेबाबत काय म्हणाले?
अभिजीत दीपके यांनी यानंतर माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, प्रथमेशची परिस्थिती हलाखीची होती. त्याचे दाजी त्याला महिन्याला ८ ते १० हजार रुपये पाठवायचे. त्यातून तो पुण्यात शिक्षण घ्यायचा. पैसे अपुरे पडायचे म्हणून एकवेळच जेवायचा. त्याची कौटुंबिक परिस्थिती चांगली नाही. त्याला वडील नाहीत. आई आणि पाच बहिणी आहेत. त्याची आई म्हणतेय, माझा मुलगा लाल दिव्याच्या गाडीत येणार होता. पण काल रात्री तो अॅम्ब्युलन्समध्ये आला. हे कशामुळे झालं? असं मला त्याच्या आईने विचारलं असं दिपके म्हणाले. दिपके पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली नसते. प्रथमेशच्या वाट्यालाही तेच आलं. त्याच्यावर दोन अडीच लाखाचं कर्ज होतं. मित्रांकडून त्याने पैसे उधार घेतले होते. ते फेडता येत नव्हते. इतरही विवंचना त्याला होत्या. त्यातच शेतीही वाहून गेली. मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्यामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतला. केवळ दोन अडीच लाखासाठी त्याला जीवन संपवावं लागलं, असं म्हणत अभिजीत दिपकेंनी संताप व्यक्त केला.
