Rohit Pawar Allegations MPSC Chairman Office Rent: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार यांनी पुन्हा एकदा मोठा आरोप केला आहे. एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या काही परीक्षांचे पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी सातत्याने भिमनवार यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता त्यांनी भिमनवार यांच्यासाठी शासकीय खर्चातून साधारणतः १० लाख रु. प्रतिमहिना भाडे असलेले प्रशस्त, आलिशान कार्यालय घेतल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ आणि फोटो त्यांनी नुकताच एक्सवर शेअर केला.
“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे बेलापूर इथे प्रशस्त ऑफिस असतानाहीदेखील एमपीएससीचे अध्यक्ष भिमनवार यांच्यासाठी कफ परेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सेंटर वन बिल्डिंगमधील १२ व्या मजल्यावर ४,००० स्क्वेअर फुटाचे साधारणतः १० लाख रुपये प्रतिमहिना भाडे असलेले प्रशस्त, आलिशान कार्यालय घेण्यात आले आहे. काही वेळापूर्वी या कार्यालयाचे गुपचूप उद्घाटन करण्यात आले”, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
“एकीकडे आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना अध्यक्ष मात्र अशाप्रकारे उधळपट्टी करत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून एकेक हजार रुपये परीक्षा फी घेता आणि दुसरीकडे मात्र स्वतःसाठी १० लाख रुपये प्रतिमहिना भाडे असलेले ऑफिस घेता, हे शोभते का?”, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
घोटाळे करण्यासाठी कार्यालय घेतले का?
रोहित पवार यांनी पुढे आरोप केला की, राजकीय खलबते करता यावीत, कलेक्शनचे गणित आखता यावे, यासाठी मंत्रालय परिसरात हे नवे ऑफिस घेतले आहे का? आयोगाचे कार्यालय बेलापूर आणि अध्यक्ष कफ परेडला बसणार असतील तर आयोगाचा कारभार चालेल कसा? घोटाळे करण्यासाठी रान मोकळे व्हावे, म्हणून हे कार्यालय घेतले आहे का?
भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
या महिन्याभरात रोहित पवार यांनी भिमनवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अनेक पोस्ट केल्या आहेत. तसेच पुण्यात त्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनही केले होते. “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. आयोगाचे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आयोगातील भ्रष्टाचाराचे क्लीनअप शक्यच नाही. भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेऊन विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती या पदावर बसवावे. सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे ७० हजार पदांची पदभरती तत्काळ सुरु करावी”, अशा काही मागण्याही त्यांनी केल्या आहेत.
रोहित पवार यांनी फक्त एमपीएससीच नाही तर भिमनवार परिवहन विभागाचे आयुक्त असतानाच्या काळातीलही काही विषय काढून आरोप केले होते. परिवहन विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी मुख्यंमत्री आणि परिवहन मंत्र्यांना लिहिलेले एक पत्र रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर शेअर केले होते. भिमनवार यांच्या काळात परिवहन विभागात घोटाळे झाले, वसुली रॅकेटला संघटित स्वरूप दिले गेले, प्रामाणिक अधिकाऱ्यांना बनावट ACB सापळे रचून, गुंडांच्या माध्यमातून धमकावण्यात आले, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता.
