महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ड्रग्ज इन्स्पेक्टर (औषध निरीक्षक) भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन MPSC अधिकाऱ्यांसह एकूण ६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, मुख्य आरोपी ऋतुजा पाटील आणि तिचा माजी प्रियकर गौरव पाटील यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट समोर आल्यामुळे या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला आहे. द इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
“पप्पा म्हणाले घरीही सांगू नकोस, अगदी घरातही कोणाला कळता कामा नये,” असे सांगत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आखलेला हा कट अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता.
सातवा क्रमांक मिळवला, पण ब्रेकअपमुळे…
MPSC च्या ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेचा लीक झालेला पेपर ऋतुजाने घोकून पाठ केला होता. २२ मार्च रोजी झालेल्या या परीक्षेत तिने यश मिळवत गुणवत्ता यादीत थेट सातवा क्रमांक पटकावला.
परंतु, या यशानंतर घडलेल्या एका घटनेने संपूर्ण प्लॅन उलथावून टाकला. ऋतुजाला लीक झालेला पेपर देण्यास मदत करणाऱ्या तिच्या माजी प्रियकराला, गौरव पाटीलला एक भीती सतावत होती. ऋतुजाला सरकारी अधिकारी म्हणून क्लास-वनची नोकरी मिळाली, तर ती आपल्याला सोडून निघून जाईल, या असुरक्षिततेतून त्यांच्यात वाद झाला आणि ब्रेकअप झाले.
याच रागातून आणि भीतीपोटी गौरवने थेट MPSC आयोगाला ई-मेल पाठवून पेपर लीक झाल्याची टीप दिली. तपासाची चक्रे फिरली आणि पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हॉट्सॲप चॅटने या प्रकरणाचे सर्व धागेदोरे उघड केले.
लीक झालेली व्हॉट्सॲप चॅट काय सांगते?
परीक्षेच्या दिवशी म्हणजे २२ मार्च रोजी ऋतुजा आणि गौरव यांच्यात झालेला हा संवाद धक्कादायक आहे:
ऋतुजा: दिलेल्या प्रश्नांपैकी ७८ प्रश्न जसेच्या तसे आले होते आणि ते मी पूर्ण खात्रीने सोडवले आहेत.
ऋतुजा: त्याव्यतिरिक्त मी आणखी १३ अतिरिक्त प्रश्न सोडवले, म्हणजे एकूण ९१ प्रश्न सोडवले आहेत. ७७-७८ प्रश्न पूर्ण आत्मविश्वासाने बरोबर आले आहेत, आता त्याला २ ने गुणून बघ. बाहेर गेटवर दादू भेटला, त्याच्याशी बोलले. माझा मोबाईल जमा केला होता.
गौरव: ठीक आहे. प्रश्नपत्रिका मिळाली असेल तर चेक करून घे, किती बरोबर आले ते बघ. तानूची परीक्षा सुरू आहे, म्हणून इंटरनेट सुरू ठेवले आहे.
ऋतुजा: पप्पांनी सांगितले आहे की मयूर ठाकरेला याबद्दल आता कुठेही काहीही सांगू नकोस. अगदी घरातही सांगायचे नाही, कारण त्यांनी स्वतःच्या भावालासुद्धा याबद्दल काहीही सांगितलेले नाही. त्यांच्याकडे पैसे नाहीत, जे काही जमा केले होते ते भावाच्या लग्नासाठी ठेवले होते.
ऋतुजा: पण या कामाची काही गॅरंटी नाही, कधीही काहीही होऊ शकते. स्टे ऑर्डर येऊ शकतो किंवा कट ऑफ खूप वर जाऊ शकतो. आणि जर मुलाखत (Interview) क्लिअर झाली नाही तर काय करायचे? त्यामुळे पप्पा म्हणाले यावर अवलंबून राहू नकोस, सध्याच्या जॉबवर लक्ष ठेव. देवाची इच्छा असेल तर होईल, नाहीतर विषय सोडून दे.
गौरव: ठीक आहे.
ऋतुजा: कौटिल्याने (कोचिंग क्लास संचालक) उद्या ५ लाख रुपये मागितले आहेत. उद्या काहीही करून ५ लाख रुपये देण्याची सोय कर. उद्या ५ लाख कुठून आणायचे याच्या ताणतणावात पप्पा आहेत.
पकडले जाऊ नये म्हणून १० उत्तरे मुद्दाम चुकवली!
तपासादरम्यान गुन्हे शाखेला आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. ऋतुजाला मिळालेल्या लीक प्रश्नपत्रिकेत शंभर टक्के गुण मिळाले, तर संशय येईल आणि ती रडारवर येईल अशी भीती या टोळीला होती. म्हणूनच, संशय टाळण्यासाठी ऋतुजाला परीक्षेत मुद्दाम १० प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिण्याच्या सूचनेसह पेपर देण्यात आला होता.
सध्या पोलीस या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, MPSC मधील संशयित कर्मचाऱ्यांची साखळी आणि उर्वरित फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
