गोष्ट दहावी नापास तरुणाची! जिद्दीच्या जोरावर MPSC त मिळवलं यश; बनला अधिकारी

MPSC Exam : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाची कौतुकास्पद कामगिरी; आठवीनंतर सोडली होती शाळा… दहावीत झाला नापास… अतिदुर्गम गोंडपिपरीतील प्रशांत खर्डीवार बनला सहाय्यक प्रशासकीय अधिकारी

mpsc Exam, mpsc success story, competitive exam story
MPSC Exam : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाची कौतुकास्पद कामगिरी; आठवी सोडली होती शाळा… दहावीत झाला नापास… अतिदुर्गम गोंडपिपरीतील प्रशांत खर्डीवार बनला सहाय्यक प्रशासकीय अधिकारी.

मनाशी ठाम निश्चय केला की, अडथळ्यांतून मार्ग काढत माणूस यशाला गवसणी घालू शकतो, असे आणि यासारखे विचार दररोजच्या आयुष्यात ऐकायला मिळतात. याचीच प्रचिती देणारी एक घटना दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील प्रशांत खर्डीवार या तरुणाने जिद्दीच्या जोरावर अपयशावर पाय ठेवून यशाचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. आठवीनंतर चार वर्ष शाळा सोडलेल्या अन् दहावीत एकदा नापास झालेल्या प्रशांत खर्डीवारने कौतुकास्पद यश मिळवलं आहे. प्रशांतने समाज कल्याण निरीक्षक ते लोकसेवा आयोगाकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत मजल मारली.

गोंडपिपरी तालुका मागास व अतिदुर्गम समजला जातो. त्यामुळे या भागात स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचा आकडा बोटावर मोजण्याइतकाच आहे. यातलंच एक नाव म्हणजे प्रशांत खर्डीवार! प्रशांत खर्डीवार या तरुणाची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर प्रशांतने अचानक शाळा सोडली आणि शेतीत लक्ष घातलं. वयाच्या १५व्या वर्षी शाळा सोडल्यानं त्यांच्या कुटुंबियांनाही याचं आश्चर्य वाटलं. पुढे प्रशांतने चार वर्ष शेती केली. चार वर्ष शेतीत काम केल्यानंतर त्याचं मन शिक्षणाकडे वळलं. शिक्षणाविषयी आवड निर्माण झाल्याने प्रशांतने पुन्हा शाळेत प्रवेश घेतला. पुढे दहावीची परीक्षाही दिली. पण, पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी ठरला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिनही भाषा विषयात प्रशांत नापास झाला. पण, प्रशांतने हार मानली नाही.

प्रशांतने दुसऱ्या वर्षी पुन्हा दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. पुढे बारावीत महाविद्यालयातून पहिला क्रमांक मिळवत प्रशांतने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, शिक्षक होण्याचं स्वप्न बघत प्रशांतने डी.एडच शिक्षण पुर्ण केलं. पण, संकट इथेही प्रशांतच्या वाटेत अडथळा बनून आलं. या काळात शिक्षक भरती न झाल्यानं त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सातत्यपूर्ण अभ्यास करत प्रशांतने समाज कल्याण विभागाची समाज कल्याण निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली.

विविध पदांसाठी दिल्या सहा मुलाखती

पुढे तो पुणे येथे निरीक्षक पदावर कार्यरत झाला. या काळात लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा त्याने दिल्या. लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अलिकडेच निकाल लागला. या परीक्षेत प्रशांतने बाजी मारली. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर प्रशांतने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. प्रशांतने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदाच्या सहा मुलाखती दिलेल्या आहेत. तब्बल तीन वर्षांनी सहायक प्रशासकीय अधिकारी पदाचा निकाल जाहीर झाला यात त्याने यश संपादन केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mpsc exam mpsc success story competitive exam story chandrapur prashan khardiwar bmh

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या