नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ होऊन तीन महिने झाले तरी अद्याप निकाल जाहीर झालेला नाही म्हणून विद्यार्थी अस्वस्थ होते. वेळेत निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली होती. मात्र अखेर आयोगाने पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात म्हणजे २५ ते २८ तारखेपर्यंत राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होईल असा विश्वास लोकसत्ताने व्यक्त केला होता हे विशेष. यावर्षीच्या निकालाची विशेषता म्हणजे, यंदा खुल्या वर्गासोबतच ओबीसी आणि एसइबीसी प्रवर्गाचा कट ऑफ सारखा आहे. निकालाविषयी सविस्तर माहिती पाहूया.

९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेची दुसरी उत्तरतालिका २ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर महिना उलटूनही अंतिम निकालाबाबत आयोग मूग गिळून गप्प होते. विशेष म्हणजे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित आहे. निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांच्या हाती सखोल अभ्यासासाठी केवळ ४० दिवसांचा कालावधी उरणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची तयारी इतक्या कमी वेळात करणे अशक्य असल्याचे सांगत, आयोग जाणीवपूर्वक उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर ढकलत असल्याचा आरोप परीक्षार्थी करत आहेत.

पुण्यासारख्या शहरात राहून मेस, खासगी रुमचा खर्च सोसणाऱ्या उमेदवारांवर आर्थिक-मानसिक तणाव वाढत असल्‍याचे चित्र आहे. गेल्या वर्षीही मुख्य परीक्षेसाठी वेळ मिळत नाही म्हणून आंदोलन करावे लागले होते, यंदाही तीच परिस्थिती ओढवली आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षार्थी व्यक्त करत होते. आयोगाने तातडीने निकाल जाहीर करावा आणि या विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही उमेदवार करत होते. मात्र अखेर आयोगाने निकाल जाहीर केला आहे.

मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल नाही

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ च्या तात्पुरत्या वेळापत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, जाहिरात न आल्याने राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५  राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली. निकाल तयार करण्यासाठी प्रचंड विलंब झाल्याने आता लवकरच निकाल जाहीर करण्याची तयारी आयोगाने केली आहे. यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होणार असून मुख्य परीक्षेत येणाऱ्या उमेदवारांना केवळ एकच महिना मिळणार असला तरी दिलासा मिळणार नाही असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

कट ऑफमध्ये झाला बदल

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा–२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदा कट-ऑफ विक्रमी लागल्याने परीक्षेतील स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे. खुल्या वर्गाचा कट ऑफ ११६ तर हाच कट ऑफ ओबीसी आणि एसइबीसी प्रवर्गाचा आहे.