नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती २०२६ ची बहूप्रतीक्षित जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक अश तीन पदांचा समावेश आहे.
एकूण ५५२ जागांचा समावेश असून यासाठी महाराष्ट्राती ३७ परीक्षा केंद्रावर रविवार १४ जूनला परीक्षा घेण्यात येणार आहे. तब्बल एक वर्षाने ही जाहिरात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून वेळेत मागणीपत्र देऊन जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या सूचना होत्या. त्यानंतर लगेच ही जाहिरात आली आहे. या पदभरती संदर्भात सविस्तर माहिती पाहूया.
मागणीपत्राबाबात सरकारच्या सूचना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) विहित मुदतीत मागणीपत्र न आल्यामुळे निवड प्रक्रिया राबवण्याबाबतची पुढील कार्यवाही दीर्घकाळ प्रलंबित राहते. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील विविध विभागांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी मागणीपत्रांची प्रक्रिया जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच, मागणीपत्रांना विलंब झाल्यास आता संबंधित विभागांना जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या राज्यसेवा परीक्षांसाठी मागणीपत्र पाठवण्याबाबत कार्यवाही प्रशासकीय विभागांमार्फत केली जाते.
परंतु, अनेकदा विभागांमध्ये रिक्त पदांसाठीचे मागणीपत्र एमपीएससीकडे विहित मुदतीत सादर न केल्यामुळे सदर पदांसाठी निवडप्रक्रिया राबवण्याबाबतची पुढील कार्यवाही दीर्घकाळ प्रलंबित राहाते. त्यामुळे मागणीपत्रांची प्रक्रिया जलदगतीने होण्याच्या अनुषंगाने रिक्त पदांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिलला बैठक घेण्यात आली.
उमेवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना संयुक्त परीक्षा गट ब साठी १० एप्रिलपासून अर्ज भरता येणार आहे. तर ३० एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख राहणार आहे. याशिवाय परीक्षा शुल्कही ऑनलाईन माध्यमातून ३० एप्रिलपर्यंत भरता येण्णार असून बँकेतील चलनाद्वारे २ मेपर्यंत भरता येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.
रिक्त जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता
प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पर्याव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्यावर समावेश होण्याची शक्यता आहे.
त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे/संवर्ग पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित/अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्व परीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
तसेच याबाबतची घोषणा/सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
