नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे आधीच आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता कृषी सेवा मुख्य परीक्षा-२०२४च्या मूल्यमापन प्रक्रियेवरही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले आहेत. माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या आधारे मूल्यमापनात विसंगती असल्याचे दिसून येत असून, सर्व उत्तरपत्रिकांची फेरतपासणी अथवा पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे.
काही प्रकरणांमध्ये पहिल्या परीक्षकाने एखाद्या उमेदवाराला १३५ गुण दिले. त्यानंतर नियामकाने हे गुण १०१ पर्यंत, तर दुसऱ्या नियामकाने आणखी कमी करून ६८ गुणांवर आणले. त्यामुळे मूळ परीक्षकाने दिलेल्या गुणांमध्ये तब्बल ६७ गुणांची घट झाली असून, ही घट मूळ गुणांच्या सुमारे ४९ टक्के आहे. मूल्यमापनातील एवढ्या मोठ्या तफावतीमुळे पहिल्या परीक्षकाने संबंधित उत्तरपत्रिकेला इतके जास्त गुण कोणत्या निकषांच्या आधारे दिले, हा प्रश्न आहे.
‘एमपीएससी’च्या जाहिरात क्र. ०५५/२०२४ अंतर्गत कृषी सेवा मुख्य परीक्षा-२०२४ घेण्यात आली होती. दोन्ही पेपर प्रत्येकी २०० गुणांचे आहेत. विद्यार्थ्यांनी उपलब्ध कागदपत्रांचा हवाला देत पेपर-२मध्ये एका उमेदवाराला १८१ गुण म्हणजेच ९०.५ टक्के गुण मिळाल्याचे निदर्शनास आणले आहे. तसेच ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची संख्या १३० असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एवढे अधिक गुण कोणत्या प्रमाणित निकषांच्या आधारे देण्यात आले, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सर्व उत्तरपत्रिकांची फेरतपासणी, परीक्षक व नियामकांच्या गुणांतील तफावतीची चौकशी आणि मॉडरेशन प्रक्रियेची स्वतंत्र पडताळणी करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या सर्व शंकांचे निरसन होईपर्यंत कृषी सेवा मुख्य परीक्षा-२०२४च्या निकालावर आधारित पुढील प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशीही त्यांची भूमिका आहे.

गुणदानातील तफावतीमुळे संशय
माहिती अधिकारामधून प्राप्त उत्तरपत्रिकांमध्ये काही प्रश्नांच्या गुणदानाबाबतही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. एका १५ गुणांच्या प्रश्नाला तीन मुद्दे लिहिल्यानंतर आठ गुण देण्यात आले, तर अपेक्षित स्वरूपातील उत्तर नसतानाही अन्य प्रश्नाला १० गुण देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पेपर-२मधील एका प्रश्नातील चार उपप्रश्नांसाठी २० पैकी २० गुण देण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे काही उत्तरपत्रिकांमध्ये पहिल्या परीक्षकाने १३५ गुण दिल्यानंतर नियामकाने १०१ आणि दुसऱ्या नियामकाने ६८ गुण दिल्याचे दिसून येते. त्यामुळे एकाच उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापनात ६७ गुणांची तफावत कशी निर्माण झाली, तसेच नियामकाची प्रक्रिया आणि त्याचे निकष काय होते, याचे स्पष्टीकरण आयोगाने द्यावे, अशी मागणी होत आहे.
विषय तज्ज्ञांकडून मूल्यांकन झाले का?
पेपर-२मध्ये कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, गृहविज्ञान, उद्यानविद्या आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध शाखांशी संबंधित प्रश्न असल्याने संबंधित विषयतज्ज्ञांकडून मूल्यांकन करण्यात आले होते का, याची माहितीही आयोगाने जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
