अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (MPSC) राज्य सरकारने मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. MPSC च्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे विद्यमान सदस्य सतिश बबन वाघोले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत.

आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पेपरफुटीच्या आरोपांनंतर स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींनी पुण्यात पुकारलेले तीव्र आंदोलन आणि वाढता रोष लक्षात घेता, विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर गेले आहेत.

१० दिवसांचे आंदोलन अन् अध्यक्षांचा रजेवर जाण्याचा निर्णय

MPSC मार्फत आयोजित अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुण्यामध्ये सलग १० दिवस आंदोलन केले.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारतर्फे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यातील आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली. अखेर विद्यार्थ्यांचा रोष आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत भीमनवार यांनी तपासाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

सचिवपदी सौरभ कटियार

पेपरफुटी प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) सचिवदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आला आहे. तर विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने अध्यपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.