मुंबई : तांत्रिक त्रुटींमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांच्या आयोजनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी आयोगावर माहिती तंत्रज्ञान आणि तत्सम क्षेत्रातील शिक्षणाचा व कामाचा अनुभव असलेल्या तंत्रज्ञाची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

आयोगाचे अध्यक्ष आणि अन्य सदस्यांची निवड राज्यपालांकडून केली जाते. एक अध्यक्ष आणि पाच सदस्य आयोगावर असतात. राज्य प्रशासकीय सेवांकरिता योग्य उमेदवाराची पारदर्शक पद्धतीने निवड करण्याची जबाबदारी एमपीएससीवर आहे. त्यामुळे या पदावरील व्यक्तीही अनुभव, चारित्र्य संपन्न व उच्चविद्याविभुषित असणे आवश्यक असते. आता या सदस्यांमध्ये तंत्रशिक्षणाचा अनुभव गाठीशी असलेल्या सदस्याचीही भर पडणार आहे.

एमपीएससीच्या परीक्षांचे आयोजन सुरळीत व्हावे याकरिता माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आयोगावर अन्य सदस्यांच्या बरोबरीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर, २०२५च्या अधिसूचनेने घेण्यात आला. सदस्य म्हणून कुणाची नियुक्ती करावी, यासाठीचे निकष आता निश्चित करण्यात आले आहेत.

या निकषांनुसार संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्राॅनिक्स, डाटा सायन्स, एआय, सायबर सिक्युरिटी, गणित, स्टॅटिस्टिक, ऑपरेशन रिसर्च, सिस्टिम इंजिनिअरिंग या क्षेत्रातील पदवीधर किंवा टेक्निकल, संगणक, अॅनॅलिटीकल क्षेत्रातील पीएचडीधारक असलेल्या व्यक्तीचा या पदाकरिता विचार केला जाईल. तसेच, आयटी सिस्टिम डिझाईन, डाटा अॅनॅलिटिक्स, अल्गोरिदम डिझाईन, नॉर्मलायझेशन मेथड, सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क या क्षेत्रात निर्णय क्षमतेचा कस लागेल अशा पदावर किमान १० कामाचा अनुभव आवश्यक असेल.

तांत्रिक सदस्यालाही आयोगाच्या इतर सदस्यांप्रमाणे वेतन व भत्ते, सरकारी निवासस्थान आणि वाहनाची सुविधा दिली जाणार आहे. हा सदस्य पदावर नियुक्ती झाल्यापासून ६ वर्षे किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहील.

सदस्यावरील जबाबदारी

पारदर्शक परीक्षा व मूल्यांकन प्रणाली विकसित करणे

तांत्रिक धोरणात्मक निर्णयात आयोगात सल्ला देणे,

नवीन तांत्रिक सुधारणा करणे

आयटी गर्व्हनन्स आणि सिक्युरिटी