MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली! उमेदवारांची प्रतिक्षा संपेना!

एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

MPSC
संग्रहित छायाचित्र

गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. MPSC च्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

mpsc letter
एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

येत्या १४ मार्च रोजी एमपीएससीची मार्च २०२० मध्ये होणारी पूर्वपरीक्षा होणार होती. त्यासाठी सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती. उमेदवारांना प्रवेशपत्र देखील देण्यात आले होते. आता परीक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता उमेदवारांकडून याविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

MPSC ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली. आम्हा विद्यार्थ्यांना काय मंत्र्यांचे मुलं समजता काय मुख्यमंत्री साहेब. वर्षांच्या…

Posted by Students Rights Association of India on Thursday, 11 March 2021

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा करोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. करोनाचा ज्वर काहीसा कमी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात त्या घेण्याचं ठरलं. उमेदवारांनी तयारी देखील सुरू केली. ११ ऑक्टोबर तारीख ठरली. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबितच असल्यामुळे ती पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यासाठी आक्रमक भूमिका देखील घेतली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरला होणाऱ्या दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mpsc prelim exam postponed again amid corona outbreak in maharashra pme