मागील सात दिवसांपासून रोहित पवार यांच्या नेतृत्वात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. पुण्यात सध्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या तीन वेगवेगळ्या गटांकडून आंदोलनं सुरु असली तरी रोहित पवार यांचे आंदोलन सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे ठरत आहे. रोहित पवार गेल्या सहा दिवसांपासून एस.एम. जोशी पुलाजवळच रात्री विद्यार्थ्यांसोबत दिवस-रात्र ठिय्या मांडून आहेत. ते रोज रात्री येथेच झोपत आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी एक जाहीर पत्र लिहून आपल्या भावना मांडल्या आहेत. राजेंद्र पवार यांचे हे भावनिक पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालं आहे.

रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी काय म्हटलंय?

प्रिय रोहित,
परवा #MPSC च्या चालू आंदोलनात तुझ्यासोबत रस्त्यावर झोपलो.तुझा संघर्ष व कमिटमेंट असूनही विरोधक सतत म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधू लागलो.१९५४ ला ११० रुपये पगारावर माझे वडील आप्पासाहेब पवार नोकरीला लागले.२५ वर्षे नोकरी, उरलेली २५ वर्षे शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम.महाराष्ट्राला क्रॉसब्रीड गायींची ओळख करून देऊन आजची ग्रामीण अर्थव्यवस्था दुधामुळे बदलली,१९८० ला ड्रिपचा प्रसार करून प्रथम पाणी बचतीचा मार्ग दाखवला. शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांसाठी काम केले,केंद्रसरकारने पद्मश्री दिली. शेवटपर्यंत सामाजिक काम करत असतानाही राजकारणी भावासाठी राजकीय मदत “थँकलेस जॉब” असला तरी करत राहिले.

तू राजकारणात येण्यापूर्वी…

राजेंद्र पवार पुढे म्हणाले, तुझा बाप १९७८ साली अवघे ५०० डॉलर घेऊन अमेरिकेला संघर्षातूनच शिक्षण घेण्यास गेला.तिथल्या झगमगाटीतील सोन्याचा चमचा न पाहता महाराष्ट्रातील स्वतःच्या शेतीत आला.शेती ही आनंद व संघर्षाचे मिश्रण आहे,हे करत एक नावाजलेली संस्था सामाजिक भावनेतून चालवत असतानाच मुरघास,कृषिक #Contract_Farming_in_Poultry व अनेक उपक्रमाची ओळख शेतकर्‍यांना करून देत आहे.
तुझे कॉलेज संपल्यानंतर तू एकटा नोकरी न करता हजारो ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत तू राजकारणात येण्यापूर्वी आपण स्वत:ची इंडस्ट्री उभी केली. लहानपणी तुला भारी खेळणी नव्हती म्हणून तू गड्यांची पोरं घेऊन मासे,खेकडे पकडायला ओढ्याने जायचास.ते धरताना बिळ सापाचे का खेकड्याचे याचा विचार न करता त्यात हात घालायचास,तुझी हात घालण्याची ही धाडसी सवय त्यामुळेच तयार झाली असावी.पण तू आता राजकारणात आहेस, राजकारणातील एखादा विषारी साप जर कधी डसला तर विष पचवायची तयारी ठेव,आणि त्याचे दात उपसायची हिम्मतही!

इतिहासात अनेक बापांना रडता आलेलं नाही-राजेंद्र पवार

इतिहासात आणि आताही अनेक बापांना रडता आले नाही आणि काळजीही करता येत नाही.उभारणीच्या संघर्षात वेळ गेल्यामुळे लहानपणी खेळवताही आले नाही पण आता तुझ्या पाठीशी आहे. “लढ,संघर्ष अटळ आहे,ना तुझा बाप राजकारणात होता ना तुझ्या बापाचे मोठे राजकारण आहे!” त्यामुळे तुझा सोन्याचा चमचा तुला मिळणारही नाही पण स्वतःसाठी राजकारण न करता हजारो तरुण पिढ्यांचे आणि गोरगरिबांचे सोने कर.
तुझा पाठीराखा बाप
राजेंद्र पवार

असं पत्र रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी लिहिलं आहे आणि त्यांना हुरूप वाटेल असं त्यांचं वर्णन केलं आहे. यावर रोहित पवार काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.