राज्यात सध्या ‘एमपीएससी’च्या ‘एफडीए’ पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यावरून एमपीएससीच्या आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, छत्रपती संभाजीनगरसह आदी शहरांत विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. ‘एमपीएससी’च्या पेपरफुटीच्या आरोपांवरून राजकारण तापलेलं असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईत ‘एमपीएससी’च्या सचिवांच्या तोंडाला काळ फासलं आहे. एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याची घटना आज (११ सप्टेंबर) नवी मुंबईत घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ही घटना घडल्यानंतर काहीवेळ मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलं?
“एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांनी पेपरफुटी, भ्रष्टाचार या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निश्चितच खेळ केला आणि याबाबत विद्यार्थ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत हे नक्की खरं आहे. मात्र, त्याचा विरोध आपण संविधानिक मार्गाने करत आहोत आणि करत राहू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात तेवढी ताकद आहे, त्यामुळे आपण नक्कीच यशस्वी होऊ. संविधानिक मार्ग हाच राजमार्ग… कुणाच्या अंगावर शाई टाकण्याला आमचं कदापि समर्थन नाही”, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.
परीक्षांची एसआयटी चौकशी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
राज्य लोकसेवा आयोगाच्या गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा २०२५ ची विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. त्याचप्रमाणे सन २०२५ च्या मुख्य परिक्षेतील प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी करण्याची आणि तोवर मुलाखतींचा कार्यक्रम स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आपल्या मागण्या मान्य झाल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या दोन वर्षात राज्य लोकसवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध पदभरतीच्या परिक्षांचे पेपर फुटल्यावरुन आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत उमेदवारांनी आंदोलन सुरु केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधत सर्व मागण्या मान्य केल्या.
