पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक, ऐच्छिक विषय वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता उमेदवारांना वैकल्पिक विषयाचे दोन पेपर द्यावे लागणार नाहीत. या बदलामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा आता २०२५ ऐवजी १५२५ गुणांची होणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी २०२७च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून केली जाणार आहे.

‘एमपीएससी’च्या परीक्षा नियंत्रक व सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. तमिळनाडू, तेलंगण, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यांतील लोकसेवा आयोगांनी त्यांच्या राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीमधून वैकल्पिक, ऐच्छिक विषय वगळून त्याऐवजी अधिक एकसमान आणि प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब अंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वीच्या परीक्षा योजनेनुसार लेखी आणि मुलाखतीचा समावेश असलेली मुख्य परीक्षा २०२५ गुणांची होती. मात्र, २०२७ पासून लागू होणाऱ्या सुधारित योजनेत एकूण ७ पेपर अनिवार्य राहतील. त्यामध्ये भाषा पेपर १ (मराठी) व भाषा पेपर २ (इंग्रजी) हे प्रत्येकी ३०० गुणांचे पेपर असून, त्यामध्ये २५ टक्के गुणांसह पात्रता मिळवणे आवश्यक राहील. निबंध (मराठी किंवा इंग्रजी) विषयासाठी २५० गुण असतील. सामान्य अध्ययन (जीएस १ ते जीएस ४) प्रत्येकी २५० गुणांचे चार पेपर (एकूण १००० गुण) असतील. या बदलामुळे वैकल्पिक विषयांचे ५०० गुण पूर्णपणे वजा झाले आहेत. मुलाखतीचे २७५ गुण तसेच राहतील. त्यामुळे मुख्य परीक्षेचे एकूण गुण (पेपर क्र. ३ ते ७) आता १७५० वरून १२५० झाले आहेत. परिणामी, अंतिम गुणवत्ता यादीसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत मिळून मुख्य परीक्षा १५२५ गुणांची होणार आहे. सुधारित परीक्षा योजनेचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाणार आहे.

वन, अभियांत्रिकी सेवा परीक्षा जुन्याच पद्धतीने ज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल केवळ राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठीच लागू आहे. महाराष्ट्र नागरी सेवेतील महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयांची तरतूद पूर्वीप्रमाणेच लागू राहील. तसेच, महाराष्ट्र स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा आणि निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा या सर्व परीक्षा प्रचलित योजनेनुसारच घेतल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवारांमध्ये मतमतांतरे

‘एमपीएससी’ने राज्यसेवा मुख्य परीक्षेत केलेल्या बदलांबाबत उमेदवारांमध्ये मतमतांतरे आहेत. ‘आयोगाचा निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना समान संधी मिळेल. वैकल्पिक विषयांतील काही विषय अवघड असतात, तर काही विषय तुलनेने सोपे असतात. त्यामुळे या निर्णयाबाबत उमेदवार अनुकूल आहेत,’ असे चेतन वागज या स्पर्धा परीक्षार्थ्याने सांगितले. स्टुडंट्स राइट असोसिएसनचे किरण निंभोरे म्हणाले, ‘अभ्यासक्रम कमी झाल्याने उमेदवारांचा या बदलाला विरोध नाही. पण, अनेक उमेदवारांनी दोन-तीन वर्षे तयारी केली आहे. आता अचानक हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांचा वेळ, पैसा यात गेला आहे.’