MPSC Optional Subject Removed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सन २०२७ पासून आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ‘वैकल्पिक विषय’ (Optional Subjects) पूर्णपणे वगळण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. या बदलामुळे आता उमेदवारांना वैकल्पिक विषयांचे टेन्शन घेण्याची गरज उरणार नाही. सर्व उमेदवारांचे मूल्यमापन अधिक समान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

इतर राज्यांच्या धर्तीवर बदल करण्याचा निर्णय

सध्याच्या परीक्षा पद्धतीनुसार उमेदवारांना प्रत्येकी २५० गुणांचे दोन वैकल्पिक पेपर देणे अनिवार्य होते. मात्र, देशातील तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या अनेक राज्यांनी आपल्या लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षांमधून वैकल्पिक विषय यापूर्वीच हद्दपार केले आहेत. याच धर्तीवर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित’ (गट-अ आणि गट-ब) मुख्य परीक्षेच्या आराखड्यात हा मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कसा असेल मुख्य परीक्षेचा नवा पॅटर्न?

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, २०२७ पासून लागू होणाऱ्या सुधारित परीक्षा योजनेत एकूण ७ पेपर अनिवार्य असतील. नव्या रचनेनुसार गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल:

  • पात्रता परीक्षा (Language Papers): भाषा पेपर १ (मराठी) व भाषा पेपर २ (इंग्रजी) हे प्रत्येकी ३०० गुणांचे असतील. यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान २५% गुण मिळवणे अनिवार्य राहील. (याचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत.)
  • निबंध लेखन: मराठी किंवा इंग्रजी भाषेत निबंधाचा २५० गुणांचा एक पेपर असेल.
  • सामान्य अध्ययन (General Studies): सामान्य अध्ययन (GS-1 ते GS-4) चे प्रत्येकी २५० गुणांचे चार पेपर असतील (एकूण १००० गुण).
MPSC चा महत्त्वाचा निर्णय! राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ‘वैकल्पिक विषय’ बाद

गुणांची गणिते बदलली: वैकल्पिक विषयांचे ५०० गुण पूर्णपणे वजा झाल्यामुळे मुख्य परीक्षेचे एकूण गुण आता १७५० वरून थेट १२५० झाले आहेत. तर मुलाखतीचे (Interview) २७५ गुण पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. परिणामी, अंतिम गुणवत्ता यादीसाठीची (Merit List) एकूण गुणसंख्या २०२५ ऐवजी आता १५२५ इतकी असेल.

वन सेवा आणि अभियांत्रिकी परीक्षांच्या पद्धतीत बदल होणार का?

MPSC ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. हा नवा बदल केवळ राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीच लागू असेल. ‘महाराष्ट्र वन सेवा’ (Forest Services) मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयांची अट पूर्वीप्रमाणेच लागू राहील.

याशिवाय स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा आणि निरीक्षक वैधमापनशास्त्र या सर्व मुख्य परीक्षा जुन्या आणि प्रचलित पद्धतीनुसारच घेतल्या जातील. त्यांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या सुधारित परीक्षा योजनेचा सविस्तर तपशील लवकरच आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती परीक्षा नियंत्रक व सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी दिली आहे.