गेल्या काही दिवसांपासून एमपीएससी परीक्षांच्या विविध मुद्यांवरून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबरपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया, यासह आदी मागण्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केलेली आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. एमपीएससीच्या या विद्यार्थ्यांचं हे सत्याग्रह आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या या सत्याग्रह आंदोलनाला आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं आहे.
तसेच एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे, अशी मागणी करत ७० हजारांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या संस्थेचा ताबा घेण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मात्र, आम्ही हे असं चालू देणार नाही, असा मोठा इशाराही राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
राहुल गांधी यांनी काय म्हटलं?
“पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी माझ्यासमोर त्यांच्या सर्व समस्या मांडल्या होत्या. जसं की, विविध परीक्षांचे पेपर लीक, रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षणाचा वाढता खर्च, वसतिगृहांची दुरावस्था, डीबीटीमध्ये झालेली फसवणूक अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या होत्या. त्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की एमपीएससीमध्ये (MPSC) सुधारणा करा, परीक्षा पद्धती पारदर्शक करा आणि या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या. मात्र, त्यापैकी काहीही झालेलं दिसत नाही. त्यामुळे आता विद्यार्थी पुण्यात पुन्हा आंदोलनाला बसले आहेत”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
‘एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा’
“विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. जसं की, एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, त्यांच्या जागी एका प्रामाणिक व सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. ७० हजारांपेक्षा अधिक रिक्त सरकारी पदे त्वरित भरली जावीत. विद्यार्थ्यांच्या या मागण्या अवाजवी नाहीत. पण त्यासाठी फक्त कृतीची गरज आहे, आश्वासनांची नाही”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
‘आम्ही हे असं चालू देणार नाही’ : राहुल गांधींचा इशारा
“युथ काँग्रेस आणि एनएसयूआय (NSUI) हे या विद्यार्थ्यांच्या चळवळीच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभे राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा सुरू ठेवण्यास मी त्यांना सांगितलं आहे. मी हा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारसमोर मांडेन आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करेन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या संस्थेचा ताबा घेण्यात आला आहे. पण आम्ही हे असं चालू देणार नाही”, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.
