एमपीएसी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी रात्री दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही तत्वतः हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केलं. रात्री १ वाजून २४ मिनिटांनी विवेक भीमनवार यांनी ट्विट करुन आपण पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदावरुन दूर राहणार असल्याचे स्पष्ट केले. हे म्हणजे सरकारने भीमनवार यांना एकप्रकारे सक्तीच्या रजेवर पाठवण्यासारखे होते. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आंदोलन स्थगित केले.

MPSC विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?

१) आंदोलकांनी विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तसंच सरकारने चौकशी समिती नेमली आहे.

२) विवेक भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती, तुकाराम मुंढे हेदेखील समितीत. समिती पुढील ६० दिवसांमध्ये अहवाल देणार.

३) दिलीप भोसले हे चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत, चौकशी ६० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

४) MPSC मधील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंत, तसंच अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची चौकशी केली जाणार

५) आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन

६) तीन वर्षांत ७० हजार रिक्त पदं भरू देण्याचं आश्वासन

७) २०२७ होणाऱ्या गट क च्या पदांमध्ये वाढ केली जाणार

८) तसहीलदार भरतीत ६०-४० ऐवजी ५०-५० रेश्यो असणार आहे

९) आयोगाची सदस्य संख्या ११ पर्यंत वाढवली जाणार

१०) MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार

११) पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचं मान्य

विद्यार्थ्यांनी आंदोलनाला स्थगिती दिल्याचं केलं जाहीर

‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी सायंकाळी उशिरा भेट देऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कायदा आणि राज्यघटनेच्या चौकटीत कार्यवाही केली जाईल,’ असे सांगून त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. या आयोगाचे कामकाज सुरू असेपर्यंत ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून दूर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.

समितीत कोण कोण असणार?

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली असून, आयोगाच्या अध्यक्षपदी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांची नियुक्ती केली आहे. सचिवपदी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह माजी न्यायाधीश पी. डी. नाईक, पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचा या समितीत समावेश आहे.’