Abhijeet Dipke reaction MPSC Student Suicide Pune: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कथित पेपरफुटी आणि इतर गोंधळाच्या विरोधात राज्यात संतापाचे वातावरण आहे. पुण्यासह विविध जिल्ह्यात परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय नोकरी मिळवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण पुण्यात येत असतात. यापैकीच एक असलेल्या प्रथमेश देशमुख नावाच्या २५ वर्षीय तरुणाने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परीक्षा पुढे जाणे, अनेक काळ निकाल न लागणे, म्हणावी तशी भरती न होणे आणि आता पेपरफुटीची प्रकरणे यामुळे एमपीएससी करणाऱ्या परीक्षार्थींमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. यावर आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार प्रथमेश देशमुख हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील रहिवासी होता. मागच्या दोन वर्षांपासून तो पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो आर्थिक अडचणीत सापडला होता. परीक्षेची तयारी करताना डोक्यावर झालेले कर्ज आणि त्यातच राहत्या खोलीचे भाडे थकल्यामुळे त्याने आयुष्य संपल्याचा दावा केला जात आहे. नारायण पेठ पोलीस याची चौकशी करत आहेत.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

नीट पेपरफुटीवरील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या अभिजीत दिपके यांनी एमपीएससी विरोधात संताप व्यक्त करत प्रथमेशच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली. “प्रथमेश आज आपल्यात नाही. पण त्याच्यासाठी न्यायाची लढाई आता आपल्याला मिळून लढायची आहे”, असे आवाहन दिपके यांनी केले.

“महाराष्ट्रातील हजारो MPSC परीक्षार्थी अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबांतून येतात. अनेक जण छोट्या शहरांतून आणि दुर्गम गावांतून आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि राज्याची सेवा करण्याचे स्वप्न घेऊन पुण्यासारख्या शहरात येतात. या परीक्षेची तयारी करताना ते आयुष्यातली अनेक वर्षं खर्च करतात. घरापासून दूर राहून, अत्यंत मर्यादित पैशांत भाडे, जेवण, पुस्तके, क्लासेस आणि परीक्षेचा खर्च भागवतात. अनेक कुटुंबे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून हा खर्च उचलतात”, अशी वस्तुस्थिती दिपके यांनी मांडली.

“परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेल्यास किंवा पेपरफुटीमुळे परीक्षाच रद्द झाल्यानंतर त्याचा मोठा ताण प्रथमेश सारख्या विद्यार्थ्यांवर येत असतो. यातून आलेल्या आर्थिक अडचणीतून प्रथमेश सारखे मुले टोकाचे पाऊल उचलतात. ज्यांना सरकारची सेवा करायची असते त्यांनाच सरकारच्या अपयशामुळे जीव द्यावा लागत आहे. अजून किती प्रथमेश गेल्यानंतर सरकारला जाग येणार आहे?”, असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला.

सर्व परीक्षार्थींना केले आवाहन…

अभिजीत दिपकेंनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना आवाहन करताना म्हटले की, तुम्ही कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. तुम्ही तुमच्या घरच्यांचा, स्वतःचा विचार करावा. तुमचा जीव खूप महत्त्वाचा आहे. जे आंदोलन करत आहेत, त्यांनाही माझे आवाहन आहे की, सर्वांनी एकत्र राहावे. आपल्या सर्वांना प्रथमेशला न्याय मिळवून द्यायचा आहे.