scorecardresearch

वीज आकडे बहाद्दरांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम; हजारो अनधिकृत जोडण्या हटवल्या

वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे.

सोलापूर : वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे अनेक आकडे बहाद्दर बिनदिक्कतपणे विजेची चोरी करतात, त्यांच्या वाढीव भारामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी या आकडे बहाद्दरांना अद्दल घडविण्यासाठी बारामती परिमंडलाने धडक मोहीम हाती घेतली असून, एका दिवसांत हजारो आकडे काढून त्यांच्या केबल व मोटारी जप्त करण्याचे काम केले आहे. या प्रयत्नांमुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे. तसेच ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.

तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून महावितरणची मागणी २४ हजार ५०० मेगावॅटच्या पुढे गेली आहे. तसेच ही मागणी टिकून आहे. उलट यात वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महाराष्ट्र शासन व महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र ही परिस्थिती सबंध देशात असल्याने वीज मिळणेही अवघड झाले आहे. खुल्या बाजारात विजेचे दर १२ रुपयांपर्यंत आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

आकडे बहाद्दरांवर कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० अ‍ॅम्पीअरच्या पुढे आहे अशा ३९८ वाहिन्या बारामती परिमंडलात आहेत. त्यांना टार्गेट करून गुरुवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये अनाधिकृतपणे जोडलेले कृषीपंप, त्याचे केबल, स्टार्टर आदी जप्त केले जात आहे. घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा काढले जात आहेत. मोहिमेपूर्वी व मोहिमेनंतर किती भार कमी झाला याचा लेखाजोखा कर्मचाऱ्यांना विचारला जाणार आहे. या कामात वरिष्ठ अभियंत्यापासून जनमित्र, ऑपरेटर, कंत्राटी कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

बारामती परिमंडलात एकूण १३ विभाग आहेत. या प्रत्येक विभागातून किमान दोन हजार ग्राहकांवर जरी कारवाई अपेक्षित धरली तरी किमान २६ हजार अनधिकृत पंप हटवले जातील . त्यातून प्रति पंप ५ अश्वश्क्ती जरी गृहीत धरला तरी किमान १५० मेगावॅटपेक्षा जास्तीचा ताण कमी होणार आहे.

केडगाव विभाग अग्रेसर

महावितरणच्या केडगाव (दौंड) विभागात बागायती क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे यंत्रणा अतिभारित झाली आहे. कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांच्या पथकाने आठ दिवसांपासून आकडे काढण्यास सुरुवात केली होती. आठ दिवसांत त्यांनी १५९१ अनधिकृत शेतीपंपाचे आकडे केबलसकट काढून साहित्य उपकेंद्रात जमा केले होते. आता फिडरनिहाय कारवाईतही केडगावने आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msedcl campaign power figures bahadur thousands unauthorized attachments deleted ysh

ताज्या बातम्या