कराड : महावितरणने वीजचोरी करणाऱ्या आकडेबहाद्दरांविरुद्ध विशेष मोहिमेतून अनधिकृत वीजजोडणीचे जवळपास सव्वासात हजार आकडे काढून टाकताना त्यासाठीचे साहित्यही जप्त केले आहे. या कारवाईतून ७ कोटी ७१ लाख ४५ हजार रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा पर्दाफाश झाला आहे. आकडेमुक्त वीजवाहिन्यांसाठी ही कारवाई यापुढेही कायम ठेवण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सध्या उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा करण्यासाठी हे अनधिकृत आकडे अडथळे ठरत असल्याने वीजचोरीविरुद्ध ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात गेल्या चार दिवसांमध्ये ७ हजार २२० ठिकाणी अनधिकृत आकडे टाकून वीजचोरी सुरू असल्याचे पकडले गेले. हे आकडे तात्काळ काढून टाकण्यासोबतच त्यासाठी वापरण्यात आलेले केबल, पंप, स्टार्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या धडक कारवाईमध्ये आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये ३,०२१, सातारा जिल्ह्यात ७०३, कोल्हापूर जिल्ह्यात ३५, सांगली जिल्ह्यात ४५७ आणि पुणे जिल्हा अंतर्गत पुणे ग्रामीण, गणेशखिंड, रास्तापेठ मंडलमध्ये ५७३ आणि बारामती ग्रामीण मंडलमध्ये २,४३१ आकडे काढून टाकण्यात आले. यातील वीजचोरीचे बहुतांश आकडे हे कृषी वापरासाठी असल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा होणे, वीजवाहिनी किंवा रोहित्र अतिभारित होणे, रोहित्रामध्ये बिघाड होणे, विद्युत अपघात आदी प्रकार टाळले जात आहेत. अधिकृत वीजजोडणी घेतलेल्या ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. सोबतच विजेच्या वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी ही कारवाई अतिशय पूरक ठरत आहे. अनधिकृत वीज जोडणीमुळे जीवघेण्या अपघाताची शक्यता असते. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.