करोनाकाळातही विक्रमी वीजजोडण्या

पाच महिन्यांत महावितरणचे ५ लाखांवर नवे ग्राहक

पाच महिन्यांत महावितरणचे ५ लाखांवर नवे ग्राहक

पुणे : करोना काळातही महावितरणकडून राज्यात विक्रमी संख्येने वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. वीज मीटरची पुरेशी उपलब्धता झाल्यानंतर पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पाच लाख १८ हजार नव्या वीजग्राहकांचे वीजजोड कार्यान्वित करण्यात आले. इतर वेळेला वर्षांला सर्वधारणपणे वर्षभरात ८ ते ९ लाखांच्या आसपास नव्या वीजजोडण्या दिल्या जातात.

गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेनंतरची टाळेबंदी तसेच इतर कारणांमुळे वीज मीटरची उपलब्धता कमी झाली होती. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग मंदावला होता. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्या वेळी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत वीज मीटरचा तुटवडा संपविण्याचे तसेच नवीन वीजजोडण्यांचा वेग वाढविण्याचे आदेश दिले होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनीही क्षेत्रीय कार्यालयांना वर्षभर मुबलक वीज मीटर उपलब्ध होईल यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा धडक निर्णय घेतला होता.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, करोना काळातील वीज मीटरचा तुटवडा गेल्या पाच महिन्यांपासून संपुष्टात आला आहे. सोबतच उच्च आणि लघुदाबाच्या नवीन वीजजोडण्यांचा वेगही वाढला आहे. मार्च २०२१ पासून पुरवठादारांकडून नवीन वीज मीटर उपलब्ध होण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे १५ लाख ६६ हजार तर थ्री फेजचे १ लाख १० हजार नवीन मीटर मुख्यालयातून क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. वीज मीटर उपलब्ध झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास मोठा वेग देण्यात आला आहे. वर्षभरात महावितरणकडून ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र गेल्या मार्च ते जुलै या कालावधीत उच्चदाबाच्या ४३५ आणि लघुदाबाच्या ५ लाख १८ हजार १४२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या.

सर्वाधिक वीजजोडण्या घरगुती

नव्याने वीजजोडण्या देण्यात आलेल्या लघु आणि उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांमध्ये सर्वाधिक घरगुती ग्राहक आहेत. पाच महिन्यांत ३ लाख ८९ हजार नव्या घरगुती ग्राहकांना वीजजोड देण्यात आले. ५९ हजार ९६९ वाणिज्यिक, १० हजार ९६३ औद्योगिक, ५० हजार १७८ कृषी, तर ७४२ पाणीपुरवठा, पथदिवे आणि सात हजारांहून अधिक इतर नव्या ग्राहकांना वीजजोड देण्यात आले. सध्या वीजमीटरची उपलब्धता असल्याने ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा तपासणीत सदोष आढळल्यास वीज मीटर तातडीने बदलण्याची कार्यवाही केली जात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Msedcl provided a record number of power connections during the corona period zws