मुंबई: राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) आर्थिक वर्षातील उत्पन्न ११ हजार ४७५ कोटी रुपये असून खर्च १२ हजार ६६ कोटी आहे. एसटीचा दैनंदिन तोटा एक कोटी ६० लाख रुपये आहे. हा तोटा कमी करण्यासाठी विविध प्रकाराच्या उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. एसटीचे दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख आहे. त्याचवेळी खर्च ३३ कोटी रुपये आहे. दररोज एसटी महामंडळ एक कोटी ६० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा चिंतेचा विषय असल्याचे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. मागील आर्थिक वर्षात जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे ८ विभाग नफ्यात होते. उर्वरित २३ विभागापैकी नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या मोठ्या विभागांचा वाढता तोटा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करा, उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्यात यावा. दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तोट्यातील विभागांची सखोल चौकशी केली जाईल. सातत्याने तोट्यात असलेल्या मोठ्या विभागांमध्ये कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागपूरसारख्या मोठ्या विभागात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने तोटा होत आहे. तरीही तेथे अकार्यकारी विभाग नियंत्रक नेमण्यात आला आहे. त्याबद्दल सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी वापर आणि जबाबदारी निश्चित करण्यात यावी. तोटा कमी करण्याचा व्यापक सुधारणा आराखडा राबविण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
